उपाशीपोटी बालसंगोपन

उपाशीपोटी  बालसंगोपन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. गेल्या काही वर्षात अनेक आंदोलने करूनही शासनाने त्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले. पुरोगामी महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकेला सर्वात कमी मानधनात समाधान मानण्याची वेळ आणली आहे. महिला बालकल्याण विभागाचे खाते सांभाळणाऱ्या आतापर्यतच्या सर्वच मंत्र्यांसह शासनाने अंगणवाडी सेविकांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले, असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. आईप्रमाणे भूमिका बजाविणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना किमान आपले कुटुंब चालवता येईल एवढे तरी मानधन मिळावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. आंदोलनाच्या निमित्ताने त्यांचे प्रश्‍नांवर टाकलेली नजर....

अंगणवाडीची सुरुवात
गावोगाव अंगणवाडी ही मुलांवरील संस्कारासाठीची मुख्य वाहिनी बनली आहे. २० ऑक्‍टोबर १९७५ ला अंगणवाडी किंवा बालवाडी ही संकल्पना शासनाकडून सुरू झाली. तत्पूर्वी बालवाडी नावाची संकल्पना होती. या बालवाड्या शिक्षण विभागाबरोबरच आरोग्य विभागाच्या असायच्या. त्यानंतर १९९४ ला या सर्वाचे समानीकरण करण्यात येऊन आरोग्य विभागाच्या सर्व योजना राबविण्याच्या मुख्य हेतूने अंगणवाडीही संकल्पना अस्तित्वात आली. यावर एक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस नियुक्ती तसेच लहान अंगणवाडीसाठी मिनी अंगणवाडी सेविका नियुक्त केल्या.

स्थापनेचा मुख्य हेतू
अंगणवाडी स्थापनेचा मुख्य उद्देश आरोग्य विभागाच्या सर्व योजना राबविण्यासोबत बालसंगोपन, महिला सक्षमीकरण, लसीकरण या योजना राबविण्यात येऊ लागल्या. या सर्व योजनांचे एकत्रिकरण करून एकात्मिक बालविकास योजना तयार करण्यात आली. या योजनेवर विविध प्रकारचे उपक्रम राबवून त्याची जबाबदारी अंगणवाडीवर सोपविली. केंद्र आणि राज्य सरकार त्यावर पैसे खर्च करत असे. 

मानधनवाढीचे भिजत घोंगडे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्‍न आहे तो मानधनवाढीचा. केंद्राने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पूर्ण मानधनाची जबाबदारी झटकली आहे. फक्त ४० टक्के वेतन देऊन अन्य ६० टक्के भार हा त्यांनी राज्य शासनावर टाकला. त्यामुळे अंगणवाडीच्या मानधनबाबतचा प्रश्‍न राज्य शासनाला डोईजड वाटू लागला. वारंवार मानधन वाढीबाबत आंदोलने, मोर्चा काढण्याची वेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर येऊ लागली. आता अंगणवाडीचे खासगीकरण होण्याची शक्‍यता वाटू लागली आहे. हाच प्रश्‍न सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुळाशी आहे. जिल्ह्यातही हा प्रश्‍न तीव्र आहेच. 
जिल्ह्याभरात ३२२७ अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्याशी हा प्रश्‍न जोडलेला आहे. यात अंगणवाडी सेविका १४५२, मदतनीस १४५२, मिनी अंगणवाडी सेविका ३२३ इतक्‍या आहेत. महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकेला ५ हजार रुपये एवढे मानधन आहे. तर मदतनीस सेविकेला २ हजार ५०० आणि मिनी अंगणवाडी सेविकेला ३ हजार २५० रुपये मानधन देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. इतर राज्याच्या तुलनेत हे मानधन बरेच कमी असल्याचे दिसून येते.

कृती समितीची शिफारस
राज्यात अंगणवाडी सेविक व मदतनीसाच्या वेगवगळ्या अशा सात संघटनाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन या विरोधात आवाज उठविला. यानंतर शासनाने हालचाली सुरू केल्या. त्यांनी अंगणवाडी व मदतनीस तसेच मिनी मदतनीस यांच्या मानधनवाढ व्हावी यासाठी एक मानधनवाढ शिफारस कृती समिती नेमली. या समितीच्या अध्यक्षपदी महिला बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता वेधासिंघल यांना नियुक्ती देण्यात आली. या समितीने या प्रश्‍नाचा अभ्यास करून त्यावरचा उपाय शासन तसेच महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे याच्या दरबारी मांडण्याचा या मागचा हेतू आहे. या समितीने सेवा ज्येष्ठतेनुसार जे प्रस्ताव देण्यात येतील त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधनवाढ देण्यात यावी, अशी शिफारस केली. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना १० हजार ते १३ हजार ६०० रुपये मानधन मिळावे तर ७ हजार ५०० ते ११ हजार पर्यत मानधन मदतनीसांना मिळावे असे मतही या समितीने मांडले.

शासनाचे दुर्लक्षच
इतके होऊनही अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या व मानधनवाढीबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक हालचाली होत नसल्याचे लक्षात घेऊन कृती समितीकडून बेमुदत संप करणार असल्याचा इशारा पूर्वीच नोटीसच्या माध्यमातून दिला होता. दरम्यान पंकजा मुंडे यांनी ३० मार्चच्या दिवशी दोन दिवस आधीच मानधन वाढीचा सकारात्मक विचार करणार असे सांगून संप मागे घ्या असे सांगितले. १ जूनला मानधनवाढीची घोषणा करण्यात येईल. तसेच पावसाळी अधिवेशनात तरतूद करण्यात येईल, असे आश्‍वासन श्रीमती मुंडे यांनी दिले होते. त्यांनतर पाच महिने लोटले तरी मानधनवाढीची घोषणाच केली नाही. उलट मानधनापासून वंचित करण्याचा प्रकारच केला गेला. यानंतर तब्बल पाच महिन्याचे मानधन खात्यावर जमाच केले गेले नाही.

तुटपुंजी तरतूद
अंगणवाडी सेविकांच्या एकूण सर्व समस्याचा विचार करता यापासून मुक्त  होण्यासाठी राज्यातील अंगणवाडी व मदतनीसांसाठी १२ हजार कोटी मानधनवाढ आवश्‍यक असताना आता ३११ कोटीच मानधनवाढीची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. या मानधनवाढीबाबत अंगणवाडी सेविकांत पूर्ण नाराजी आहे. एवढे कोटी रुपये मानधनवाढीसाठी पुरेसे नसल्याचे सांगण्यात येत आहे. शासन विविध प्रकल्पांना कोटीच्या घरात रुपये देते. मेट्रो प्रकल्पाला ३५ हजार कोटी, समृद्धी प्रकल्पाला ४५ हजार कोटी रुपये द्यायला शासनाजवळ आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस या बालकांच्या जीवनासाठी सर्वात महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसाच्या १ हजार कोटी मानधनवाढीसाठी द्यायला सरकारकडे मात्र पैसे नाहीत. यावरून सरकारबाबात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

आहार मानधनही रखडले
आहार मानधनात एका मुलामागे ४ रुपये ९२ पैसे देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या आहारात १ लाडू व सोबत खिचडी वगैरे इतर वेगवेगळे पदार्थ देण्यात येतात. यासाठी वेगळे मानधन देण्यात येते मात्र या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून हे सुद्धा मानधन देण्यात आले नाही. आहारासाठी देण्यात येणारे मानधन गेले सहा महिने रखडले गेले आहे. पूर्वीच मानधनवाढीची समस्या असताना आहार मानधनातही तोटा सहन करण्याची वेळ अंगणवाडी व मदतनीस सेविकांच्या वाटेला आला आहे. या सहा महिन्याचा विचार करता एका अंगणवाडीतील १५ ते २० मुलामागे अंगणवाडी सेविकेला स्वतःच्या पदरचे जवळपास २० हजार रुपये खर्ची करण्याची वेळ आली. 
वाढले, पण...गेल्या काही दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी व मदतनीस यांनी केलेल्या १० हजार रुपयांच्या मानधनवाढीची मागणी फेटाळून लावली आहे. यात काही प्रमाणात वाढ केली आहे. यात अंगणवाडी सेविकांना पूर्वीच्या ५ हजार मानधनात १ हजार ५०० वाढ करून  ते ६ हजार ५०० तर मदतनीसांना २ हजार ५०० मध्ये हजाराची वाढ करून ३ हजार ५०० आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्वीच्या ३ हजार २५० वरून ४ हजार ५०० रुपये मानधन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र संघटनांनी ही वाढ नाकारत आंदोलन सुरूच ठेवले आहे.

भाऊबीज वाढविली
अंगणवाडी सेविका, मदतीस व मिनी अंगणवाडी सेविकांना दरवर्षी  १ हजार रुपये भाऊबीज देण्यात येते. त्यात आता वाढ करण्यात आली असून ती आता दुप्पट करण्यात आली आहे. यंदा २ हजार रुपये एवढे करण्यात आली आहे. म्हणजेच आता ३११ हजार कोटी रुपये मानधन वाढी सोबत वर्षाला ५२ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारवर पडणार आहे.

पुन्हा एकदा महामोर्चा
अंगणवाडी सेविकांना केलेली मानधनवाढ मान्य नसल्याचे अंगणवाडी सेविकांच्या नाराजीच्या भूमिकेवरून दिसून येते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात आवश्‍यक तसेच अपेक्षित मानधनवाढ झाली नसल्यामुळे केलेली मानधनवाढ विरोधात तसेच आणखी मानधनवाढी सोबत समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी २७ सप्टेंबरला मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यव्यापी महामोर्चा काढण्याचा इशारा सेविकांनी राज्यशासनाला दिला आहे. या महामोर्चात राज्यातील अनेक अंगणवाडी सेविका भाग घेतील व आपल्या मागण्या पूर्ण करायला शासनाला भाग पाडतील. हा मोर्चा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमल परुळेकर यांनी दिली आहे.

सरकारने केलेली किरकोळ मानधनवाढ म्हणजे आमच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. अंगणवाडी सेविका मुख्य भूमिका बजावते याची जाणीव सरकारला नाही. हे पंकजा मुंडे यांनी समजणे आवश्‍यक होते. इतर गोष्टीना कोटीच्या घरात रुपये देण्यासाठी सरकारजवळ आहेत. सरकारने यावर गांभीर्याने विचार करणे आवश्‍यक आहे.
- कमल परुळेकर, सरचिटणीस, राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा

सध्या महागाईची मोठी झळ बसत आहे. अशात तुटपुंज्या मानधनमुळे हाती तसे काहीच लागत नाही. मानधन वेळेतही मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणीना समोरे जाण्याची वेळ आज येत आहे. पूर्वीसारखे हाती मानधन द्यावे तसेच ते वेळेवर द्यावे. शासनाकडून मानधन वाढीबाबत ज्या काही गोष्टी करीत आहे त्या चुकीच्या आहेत. लवकरच वाढीव मानधन मंजूर करावे, अशी अपेक्षा आहे.
- शोभा सावंत,
अंगणवाडी सेविका, कारिवडे

इतर राज्यांत मिळणारे मानधन
राज्य      अंगणवाडी सेविका मानधन      मदतनीस मानधन
पाँडेचेरी                        १९ हजार      १३ हजार ३३०
तेलंगणा,                  १० हजार ५००      ६ हजार
दिल्ली                      १० हजार ५००      ७ हजार, सोबत फोन मानधन २ हजार ५००
केरळ                        १० हजार            ७ हजार
तामिळनाडू                 ८ हजार ५००      ४ हजार २००
आंध्रप्रदेश                   ७ हजार २००      ३ हजार ६००

सिंधुदुर्गातील अंगणवाडी
तालुका      मोठ्या अंगणवाड्या      मिनी अंगणवाड्या
 कुडाळ             २०६                            ७२
दोडामार्ग            ८०                            १७
वेंगुर्ले              १०७                            ४४
कणकवली        ९६                             ४९
मालवण           २०१                           ३२
सावंतवाडी       २०७                            ३४
देवगड            १६९                            ५३
वैभववाडी        ३५९                           २२
एकूण           १४५२                         ३२३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com