अतिपावसाने सिंधुदुर्गात सुपारीची गळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

कोलझर - यंदा परिसरात गेल्या पंधरवड्यामध्ये पावसाने कहर केला. या विक्रमी संततधारेमुळे सुपारी पिकाची गळ सुरू झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कोलझर - यंदा परिसरात गेल्या पंधरवड्यामध्ये पावसाने कहर केला. या विक्रमी संततधारेमुळे सुपारी पिकाची गळ सुरू झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक नारळ सुपारीचे क्षेत्र दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यात आहे. या भागात यंदा गेल्या पंधरवड्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांना विक्रमी पूर आला. नदीलगतच्या बागायतीमध्ये दिर्घकाळ पाणी साचून राहिले. शिवाय वातावरणातही दमटपणा वाढला. त्याचा थेट परिणाम सुपारीच्या पिकावर दिसू लागला आहे.

गेली दोन-तीन वर्षे वातावरणातील बदलामुळे सुपारीच्या पिकात मोठी घसरण होत आहे. यंदा तर सरासरीच्या निम्मेच पीक दिसत होते. यातही या नव्या संकटाची भर पडली आहे. सुपारी पीक पक्व व्हायला आता सुरवात झाली आहे; मात्र शेवटच्या टप्प्यातील कोवळी फळे आता बाळसे धरु लागली आहेत. या पूर्ण पिकाचीच गळ सुरू झाली आहे. 
यामुळे झाडावर असलेले उत्पन्नही शेतकऱ्याच्या हातात किती प्रमाणात मिळणार याबाबत साशंकता आहे. यंदा खर्च केलेले पैसेतरी मिळतील की नाही अशी शंका बागायतदार घेत आहेत.

निरुपयोगी पाऊस
शेवटच्या टप्प्यात या भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे आकडेवारीच्या पातळीवर पावसाने समाधानकारक हजेरी लावली असलीतरी आगामी पाणीटंचाईच्यादृष्टीने याचा काहीच उपयोग नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. शेवटच्या टप्प्यात पाऊस झाल्याने ते पाणी जमिनीत मुरत नाही. ते वेगाने समुद्राकडे वाहून जाते. यामुळे पाऊस पडूनही टंचाई कायम राहणार अशी भीती व्यक्त होत आहे.