वातावरणातील बदल आंब्यासाठी अडचणीचा

वातावरणातील बदल आंब्यासाठी अडचणीचा

सावंतवाडी - बदलत्या वातावरणाचा आंबा मोहोरावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. ढगाळ वातावरणामुळे बागायतदार चिंतेत आहेत. प्राथमिक स्वरूपात मोहोर येण्याच्या टप्प्यावरच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास तुडतुड्याची भीती वर्तविण्यात येत आहे. तर मोहोरावरच पालवी फुटण्याच्या प्रक्रिया व मोहोरावर ब्रेक अशी टांगती तलवार आंबा बागायतदारांपुुढे मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारे ठरणार आहे. वेंगुर्लेत ५ टक्के कलमांना मोहोर आला आहे तर देवगडमध्ये या उलट ९५ टक्के मोहोराचे पालवीत रूपांतर झाल्याची स्थिती आहे.

परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देणारे आंबा हे हंगामी मोठे पीक आहे. मोहोराला १८ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची आवश्‍यकता आहे; मात्र तशी स्थिती दिसून येत नाही. जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत दक्षिण भाग व गोव्यात किरकोळ स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अशात बाष्पयुक्त स्वरूपाच्या पावसाच्या सरीचा शिडकाव झाल्यास त्याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसू शकतो.

भातपिकासोबत आता बागायतदारांना चिंतेत पडण्याची वेळ आली आहे. याच महिन्यात अनुकुल स्वरुपाची थंडीची आवश्‍यकता होती; मात्र अशात अवकाळी पावसाच्या सरीची शक्‍यता व ढगाळ वातावरण शेतकऱ्याची ही चिंता वाढविणारी ठरत आहेत. मोहोर येण्याच्या काळातच वातावरणात बदल होत असल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रियाच मंदावली गेल्याचे दिसून येत आहे.

परिणामी लोकांना हापूसची चव उशिराच चाखता येणार आहे. शिवाय कमी उत्पादन मिळाल्यास त्याचा परिणामही व्यापारावर होणार असल्याचे सूचित होत आहे. मोठ्या पावसाच्या सरी होणार नसल्या तरी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार परवाच्या दिवशी १९ नोव्हेंबरला जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी दमट व ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. 

वैभववाडी, कणकवली तालुक्‍यांत काल (ता. २०) पावसाच्या मोठ्या सरींचा शिडकावाही झाला. दरम्यान देवगड, सावंतवाडी, कुडाळ व मालवणात बऱ्याच ठिकाणी वातावरण सर्वसाणधारण दमटपणाचे राहिले होते; मात्र वेंगुर्लेत वातावरण अनुकूल स्वरूपाचे होते. त्यामुळे येथील आंबा बागायदारांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. आजही काहीसे वातावरण ढगाळ होते. यंदा पाऊस उशिरापर्यंत झाला. त्यामुळे थंडीही उशिराने सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. अद्याप अनुकूल अशी थंडीच पडलेली नाही.

ढगाळ वातावरण राहिल्यास ऐनवेळी तुडतुड्याची भीती निर्माण झाली आहे. दिवसा उकाडा वाढल्याचेही चित्र देवगड भागात आहे. काही वर्षांपूर्वी मोहोर येण्याची स्थिती सर्वसाधारण होती. ढगाळतेमुळे मोहोराऐवजी पालवी येण्याची स्थिती निर्माण होते. तसे झाल्यास मोहोरावर ब्रेक येण्याची स्थिती निर्माण होवू शकते. मागील काही वर्षात ही स्थिती निर्माण होत आहे.

यंदाचे अनुकुल नसलेले वातावरण ही एक मोठी चिंता बागायतदारांसमोर आहे. दोन दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजानुसार गोवा व दक्षिण कोकणातील भागात तुरळक पावसाच्या सरींचा अंदाज होता. त्यानुसार वातावरण पुढील तीन ते चार दिवस ढगाळ राहणार असल्याची शक्‍यता आहे. आधीच परतीचा पाऊस लांबणीवर पडला त्यातच अवकाळी पावसाचे सावट अशात मोहोर येण्याच्या प्रक्रियेवरही विपरीत परिणाम होत आहे. 

देवगडमधील स्थिती
 ९५ टक्के आलेल्या मोहोराचे पालवीत पांतर
 मधल्या काळात ५ टक्के मोहोर
 सद्यःस्थितीत क्वचितच २ टक्के मोहोर
 उष्णता वाढण्यामुळे करपा रोगाची शक्‍यता
 ढगाळ वातावरणामुळे तुडतुड्याची शक्‍यता.
 आंब्याला प्रतिकूल वातावरण

वेंगुर्लेत काहीसे अनुकुल वातावरण 
जिल्ह्यात विविध ठिकाणी ३१ हजार ५१७ हेक्‍टरवर आंबा बागायत आहे. यात देवगड व वेंगुर्ले तालुक्‍यात सर्वाधिक आंबा बागायती असून, वेंगुर्लेत बऱ्याच ठिकाणी वातावरण सर्वसाधारण राहत आहे; मात्र देवगड परिसरातील भागात ढगाळपणाचे त्याचबरोबरच सावट निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी दमटपणा जाणवत आहे.

वेंगुर्लेतील स्थिती (फळसंशोधन केंद्रानुसार)
 ५ ते १० टक्के आंबा कलमांना मोहोर
 ९५ टक्के आंबा कलमे मोहोर फुटण्याच्या अवस्थेत
 यंदा मोहोर उशिराने
 मधल्या काळात आठ ते दहा दिवसानी लांबला
 सर्वसाधारण अनुकूल वातावरण

देवगडमध्ये फारसे वातावरण अनुकुल नसल्याचे चित्र आहे. करपा तसेच तुडतुडा होण्याचीही मोठी शक्‍यता आहे. सद्यस्थितीतही वातावरण ढगाळ आहे. बऱ्याच ठिकाणी माहोराचे पालवीत होणारे रुपांतर चिंतेचे कारण ठरत आहे.
- डॉ. किरण मालशे, 

प्रभारी अधिकारी, 
आंबा संशोधन केंद्र देवगड
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com