नारळ चोर पोत्यासह पडला विहिरीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

दोडामार्ग - चोरीच्या उद्देशाने साटेली-भेडशी येथील नारळ बागेत गेलेला परमे येथील चोर पळताना नारळाच्या पोत्यासह विहिरीत पडला. अख्खी रात्र त्याला विहिरीतच काढावी लागली. सकाळी गावकऱ्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि घोटगे, परमे, साटेली भेडशी परिसरात सातत्याने चोरी करणाऱ्या चोराचा छडा लागला.

दोडामार्ग - चोरीच्या उद्देशाने साटेली-भेडशी येथील नारळ बागेत गेलेला परमे येथील चोर पळताना नारळाच्या पोत्यासह विहिरीत पडला. अख्खी रात्र त्याला विहिरीतच काढावी लागली. सकाळी गावकऱ्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढले आणि घोटगे, परमे, साटेली भेडशी परिसरात सातत्याने चोरी करणाऱ्या चोराचा छडा लागला.

कुठल्याही गोष्टीचा अतिहव्यास नेहमीच वाईट ठरतो. असाच अनुभव साटेली-भेडशीत चोरी करण्यासाठी आलेल्या ‘त्या’ नारळ चोराला नक्कीच आला असेल. परमे येथील ‘त्या’ चोराने दिवसभरात चोरलेले नारळ सायंकाळपर्यंत विकले; पण आणखी मागणी असल्याने त्याला अधिक पैसे कमावण्याची हाव सुटली. सध्या नारळाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे परमेतील तो चोरही सध्या सक्रिय झाला होता. 

सैन्यदलात असलेल्या पिकुळे येथील सत्यवान गवस यांनी साटेली येथे जमीन घेऊन बागायत केली आहे. त्यासाठी विहीर खोदून त्यावर मोटरही बसवली आहे. ती बाग घोटगे परमे रस्त्यालगत साटेली गाव मागे पडल्यावर आहे. सध्या श्री. गवस नोकरीच्या ठिकाणी आहेत. त्याचाच गैरफायदा घेत बागेतील नारळ काढून त्याने पोत्यात भरलेही; पण कुणाचा तरी आवाज आल्याने त्याने पळण्याचा प्रयत्न केला आणि तो तिथेच फसला. बागेतील विहिरीभोवती एक दीड फूट उंचीचा कठडा असला तरी अनेक ठिकाणी कठड्याची पडझड झाली आहे. पळताना तो कठडा नसलेल्या काठावर अंदाज न आल्‍याने तो नारळाच्या पोत्यासह विहिरीत पडला.

विहीर तीस-चाळीस फूट खोल. वेळ रात्री आठ-सव्वाआठची. त्याने आरडाओरडा केला. विहीर तशी रस्त्यापासून शंभरेक फुटांवर, त्यात पाऊस, विजेचा लखलखाट आणि गडगडाटामुळे त्याचा आवाज कुणाला ऐकू गेला नाही. त्यामुळे रात्रभर पाण्यात राहण्याची वेळ त्याच्यावर आली. 

विहिरीत खाली सिमेंटच्या काही रिंगा आहेत. त्यातील सर्वात वरच्या रिंगेवर गुडघाभर पाण्यात तो रात्रभर उभा राहिला. ओरडून, ओरडून घसा बसलेला, पोटात भुकेने कावळ्यांचा कलकलाट सुरू झालेला, तरीही उजाडल्यावर त्याने पुन्हा आरडाओरडा सुरू केला. अखेर सात साडेसातला त्याचा आवाज कुणीतरी ऐकला. विहिरीत डोकावून पाहतात, तर काय आत तो उभा, गलितगात्र आणि घाबरलेला! 

म्हणता म्हणता बातमी गावभर पसरली. विहिरीभोवती लोक जमले. भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी आपल्या घराकडून घोटगे येथून येत होते. गर्दी बघून तेही त्यात सामील झाले. चोरी करून पळून जाण्याच्या नादात चोर विहिरीत पडल्याचे कळताच त्यांनी पोलिस ठाण्यात आणि तहसीलमधील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळविले; पण त्यांच्यापैकी कुणीच तेथे पोचले नाही. अखेर साटेली-भेडशीचे सरपंच नामदेव धर्णे यांना बोलावण्यात आले. मोठा दोरखंड आणण्यात आला. तोपर्यंत काहींनी त्याची अवस्था बघून बादलीत वडापाव घालून ती विहिरीत सोडली. वडापाव खाऊन तरतरीत झाल्यानंतर त्याला बाहेर काढण्याची तयारी झाली. जमलेल्या गावकऱ्यांनी मग ‘जोर लगाके हैशा’ म्हणत त्याला विहिरीतून ओढून काढले. त्या वेळी त्या नारळ चोराने सुटकेचा निश्वास सोडला.

दैव बलवत्तर...
काही दिवसांपूर्वी विहीर कोसळली होती. मोटार पाण्यात पडली होती. त्या वेळी आत घोणस, नाग आढळले होते. ते बाहेर काढून सोडण्यात आले. पावसामुळे विहिरीत सुमारे पंधरा-वीस फूट पाणी साठलेले आहे. मिट्ट काळोख, सामसूम आणि मुसळधार पाऊस सोबत घेऊन त्याने कशीबशी रात्र काढली.

Web Title: sindhudurg news coconut thieves fell in well