विष प्यायल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

विष प्यायल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

माणगाव -  माणगाव खोऱ्यातील हळदीचे नेरुर येथील एका शाळेत प्रार्थना चालू असताना चक्कर येऊन पडल्यानंतर प्राजक्ता विजय पवार (वय १७) या अकरावीतील विद्यार्थिनीला उपचारासाठी सावंतवाडी येथे नेत असताना वाटेतच तिचे निधन झाले. विषारी द्रव्य पोटात गेल्याने हा प्रकार घडला. मृत्यूच्या कारणाबाबत गूढ निर्माण झाले आहे. 

सातोळी (ता. सावंतवाडी) येथील प्राजक्ता ही शिवापूर येथील मामाकडे शिक्षणासाठी होती. दररोजप्रमाणे आज सकाळी ती शाळेत आल्यानंतर प्रार्थनेला उभी असताना चक्कर येऊन कोसळली. लागलीच शिक्षकांनी तिला खासगी वाहनाने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले; मात्र तिची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला सावंतवाडी येथे नेत असताना वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. तिच्या मृत्यूनंतर सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तिच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पोलिस तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होणार आहे. 

निळे द्रावण नेमके कसले?
प्राजक्ता हिने पाण्याच्या बाटलीतून निळ्या रंगाचे द्रावण आणले होते. तिने ते प्यायल्यानंतर मैत्रिणींना रॉकेल असल्याचा संशय आल्याने शिक्षकांना माहिती दिली; मात्र तिने विष प्यायल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी तातडीने उपचारासाठी तिला माणगावला पाठविले.

दुकानवाड परिसरात चर्चेला उधाण
आठ दिवसांपूर्वी प्राजक्ता हिच्याशी गैरवर्तनाचा प्रकार घडला होता. तिने याबाबत संबंधितांकडे तक्रार केली. मात्र, तक्रारीकडे दुर्लक्ष करत ज्याने हे कृत्य केले त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यामुळे प्राजक्ता तणावाखाली होती. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. याच भागातील तीन व्यक्ती तिच्या घरी गेले होते. ते कोणत्या कारणासाठी गेले किंवा त्यांनी दबाव टाकला का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com