राणेंना एनडीएमध्ये घेताना भाजपने पुर्नविचार करावा - दीपक केसरकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमि लक्षात घेता त्यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने पक्ष स्थापन करावा लागला. आता एनडीएमध्ये घेताना भाजपने पुर्नविचार करावा, अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमि लक्षात घेता त्यांना भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिला नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने पक्ष स्थापन करावा लागला. आता एनडीएमध्ये घेताना भाजपने पुर्नविचार करावा, अशी टीका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान ज्या शिवसेनेच्या माध्यमातून राणे मोठे झाले. अनेक पदे भोगली. त्याच पक्षाच्या पक्षप्रमुखांवर ते  टीका करीत असतील, तर ते मी खपवून घेणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही केसरकर यांनी दिला आहे.

श्री. केसरकर म्हणाले, “याठिकाणी राणेंनी आपल्या पक्षाची घोषणा केली. शिवसेनेतून बाहेर पडताना राणेंनी तब्बल अनेक आमदार फोडले होते. त्यांनी तशी ताकद दाखविली होती; मात्र आता पक्ष स्थापन करण्याची घोषणा करताना ज्यांना राजकारणात काहीही किंमत नाही, अशा लोकांना घेवून बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांच्या सोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले कार्यकर्ते किंवा आमदार त्यांच्यासोबत राहीले नाहीत ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे राणेंची आता काय ताकद राहीली आहे याचा अंदाज येतो.”

श्री. केसरकर पुढे म्हणाले, “भाजप हा तत्व मानणारा पक्ष आहे. त्यामुळे अशा पक्षात जाण्यासाठी श्री. राणे यांनी बरेच प्रयत्न केले; परंतु राणेंची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची असल्यामुळे तसेच इडीसह अपहरण, मासे फेकणे, मारहाण करणे अशा अनेक गुन्ह्याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू असल्यामुळे त्यांना भाजपने नाकारले. त्यामुळे नाईलाजाने त्यांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागला ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे त्यांना बाजूला ठेवून भाजपने आपला पक्ष चांगला आहे हे दाखवून दिले आहे, त्याच प्रमाणे आता एनडीएत त्यांना घेताना त्यांच्या भूतकाळाबाबत विचार होणे गरजेचे आहे.”

ते म्हणाले, “राणे हे काही माझे राजकीय शत्रू नाहीत. त्यांच्याशी कायम वैरत्व नाही. त्यांच्या प्रवृत्तीच्या विरोधात माझा लढा आहे. शिवसेनेच्या जिवावर राणे  मोठे झाले, अनेक पदे भोगली; मात्र आता ते पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करीत आहेत हे चुकीचे आहे. त्यांनी हा प्रकार सुरूच ठेवल्यास त्यांना मी जशास तसे उत्तर देईन. श्री. ठाकरे हे आमचे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधातील टिका खपवून घेणार नाही.”

यावेळी केसरकर म्हणाले, “ग्रामपंचायत निवडणूकीत आम्ही राजकारण करणार नाही हे पुर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे गाव पॅनलला आमचा पाठिंबा असणार आहे. असे असताना गाव पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेले लोक आमचेच आहेत, असा कोणी दावा करीत असेल तर ते चुकीचे आहे; मात्र कोणी घाबरू नये, विकास निधीत मी कोणालाही मागे ठेवणार नाही. निवडून आलेल्या सर्वाचे आपण अभिनंदन करतो.”

यावेळी रुपेश राऊळ, विक्रांत सावंत, शब्बीर मणियार, बाळू माळकर, प्रकाश परब उपस्थित होते.

पहीले मंत्रीपद घ्या, नंतर विकास करा

केसरकर पुढे म्हणाले, “आपण विकास केला आहे, असा दावा करणार्‍या राणेंकडे मुख्यमंत्रीपद असताना ते काहीच करू शकले नाहीत. असे असताना ते आता ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यांनी टीका करीत बसण्यापेक्षा पहीले मंत्रीपद घ्यावे आणि नंतर टीका आणि विकासाच्या गोष्टी सांगाव्यात.