महामार्ग चाैपदरीकरण मोबदल्याचे वितरण अंतिम टप्प्यात

महामार्ग चाैपदरीकरण मोबदल्याचे वितरण अंतिम टप्प्यात

कणकवली - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत बाधित होणाऱ्या खातेदारांच्या मोबदला वितरणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत सर्व प्रकल्पग्रस्तांच्या खात्यामध्ये मोबदला रक्‍कम जमा करण्याचे नियोजन शासकीय पातळीवरून केले जात आहे. तर नोव्हेंबरपासून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठीची सज्जता चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण ते कणकवली हा टप्पा केसीसी बिल्डकॉन आणि वागदे ते झाराप हा टप्पा दिलीप बिल्डकॉन या कंपन्यांकडे दिला आहे. या दोन्ही कंपन्यांनी चौपदरीकरण कामासाठी जमिनीची अंतिम मोजणी प्रक्रिया सुरू केली आहे. गावनिहाय मोबदला वितरणाची कार्यवाही पूर्ण होताच, चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने आवश्‍यक ती यंत्रसामग्री जिल्ह्यात आणली जात आहे.

महामार्ग चौपदरीकरणांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४० गावांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ७३५ कोटींचा मोबदला केंद्र शासनाने वर्ग केला आहे. यात कणकवली विभागात २०१ कोटींच्या मोबदल्याचे वितरण पूर्ण झाले आहे. तर गेल्या आठवड्यापासून कुडाळ विभागातही मोबदला रक्‍कम खातेदारांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत सर्व खातेदारांना त्यांच्या मोबदल्याचे वितरण केल्यानंतर, महामार्गाचा ताबा चौपदरीकरणासाठी कंपन्यांकडे वर्ग केला जाणार आहे.

आर्थिक उलाढाल वाढली
महामार्ग दुतर्फा असलेल्या गावातील खातेदारांच्या बॅंक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्‍कम जमा होऊ लागल्यानंतर जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीमध्ये वाढ झाली आहे. यात मंदावलेल्या रिअल इस्टेट उद्योगामध्ये प्रामुख्याने गुंतवणूक होत आहे. मोबदल्याची रक्‍कम बॅंक खात्यात जमा होत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या खात्यामध्ये जमा झालेला निधी आपल्याकडे वळविण्यासाठी अनेक बॅंका प्रयत्नशील आहेत. याखेरीज पतसंस्था, विविध वित्तीय कंपन्यांनीही अनेक योजना आणून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 

कसालसाठी ८३ कोटी मंजूर
कसाल गावातील ९७० हेक्‍टर क्षेत्रासाठी ८३ कोटी २४ लाख ७७ हजार एवढी नुकसान भरपाईची रक्‍कम भूसंपादन विभागाकडे जमा झाली आहे. कसाल येथील १०४७ शेतकऱ्यांना या मोबदल्याचे वितरण लवकरच होणार आहे. त्यासाठी संबंधित प्रकल्पग्रस्तांनी १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत तलाठी कार्यालयात बॅंक खात्याबाबतची आपली कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन कसाल तलाठी बी. एन. हातवटे यांनी केले आहे.

कणकवली विभागात सर्वाधिक मोबदला
कणकवली तालुक्‍यातील २२ गावांतील ९९.५८ हेक्‍टर बाधित क्षेत्रासाठी ४८५ कोटी ६७ लाख ४५ हजार ८०५ एवढी रक्कम प्रकल्पग्रस्तांना दिली जात आहे. तर कुडाळ तालुक्‍यातील १५ गावांतील ४२.२५ हेक्‍टर क्षेत्राच्या मोबदल्यापोटी २४९ कोटी १४ लाख ५६ हजार ५९८ एवढे रुपये रक्‍कम प्रकल्पग्रस्तांच्या बॅंक खात्यामध्ये जमा केली जात आहे.

दिरंगाईमुळे प्रकल्पग्रस्त त्रस्त
चौपदरीकरणाची रक्‍कम बॅंक खात्यामध्ये जमा होण्यासाठी विविध कागदपत्रांची मागणी प्रांत कार्यालयाकडून करण्यात आली होती. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील नुकसान भरपाईची रक्‍कम जमा होत नसल्याची तक्रार अनेक प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम मिळण्यासाठी प्रकल्पग्रस्तांना अनेक फेऱ्या देखील माराव्या लागत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com