ओखी वादळाचा प्रभाव ओसरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मालवण - ओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात गेले तीन दिवस निर्माण झालेली वादळसदृश परिस्थिती पूर्णपणे निवळल्याचे दिसून आले. खवळलेला समुद्र शांत झाला असून, लाटांचा माराही बंद झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

मालवण - ओखी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात गेले तीन दिवस निर्माण झालेली वादळसदृश परिस्थिती पूर्णपणे निवळल्याचे दिसून आले. खवळलेला समुद्र शांत झाला असून, लाटांचा माराही बंद झाला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. बंदर विभागाच्या वतीने लावलेला तीन नंबरचा बावटा हटविण्यात आल्याची माहिती बंदर निरीक्षकांनी दिली आहे.

दरम्यान, समुद्रातील वातावरण निवळल्याने काही ठराविक मच्छीमार समुद्रात मासेमारीस गेल्याचे दिसून आले. त्यांना बांगडी, तारली मासळीचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे उद्यापासून समुद्रावर पुन्हा नव्या जोमाने स्वार होण्यास मच्छीमार बांधव सज्ज झाला आहे. गेले तीन दिवस ओखी चक्रीवादळामुळे जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वादळसदृश परिस्थिती आणि सागरी उधाणामुळे मच्छीमारांची झोप उडाली होती. यात मच्छीमारांसह पोलिसांची सागरी गस्तीनौकाही बुडाल्याची घटना घडली. काल सकाळपासून सुरू झालेला पाऊस सायंकाळनंतर ओसरला. मात्र, पुन्हा मध्यरात्री मुसळधार पावसाने तालुक्‍यास झोडपून काढले. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीही साचले होते. ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्याने हवेतील गारव्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. 

चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील वादळसदृश परिस्थिती निवळण्याची चिन्हे निर्माण झाली. आज सकाळी ढगाळ वातावरण, तसेच अधूनमधून किरकोळ पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, त्यानंतर कडक ऊन पडले होते. किनारपट्टी भागात गेले तीन दिवस समुद्री लाटांच्या माऱ्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आज समुद्र पूर्णतः शांत झाल्याचे, तसेच लाटा कमी होऊन पाण्याच्या पातळीतही घट झाल्याचे दिसून आले. देवबाग, तसेच किनारपट्टी भागातील काही मच्छीमार समुद्रातील वातावरण निवळल्याने पातीने मासेमारीस गेले होते. यात त्यांना बांगडी, तसेच तारली मासळी मिळाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे उद्यापासून पुन्हा जोमाने मासेमारीस सुरुवात होणार असल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आज काही मच्छीमारांना किरकोळ मासळी मिळाल्याने येथील मासळी मंडईत काही किरकोळ महिला मच्छीविक्रीसाठी आल्या असल्याचे दिसून आले.

किनारपट्टी भागात गेले दोन दिवस ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने बंदरात तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. मात्र, वाऱ्याचा वेग कमी झाल्याने तीन नंबरचा बावटा हटविण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाल्या. त्यानुसार हा बावटा काढण्यात आला आहे, अशी माहिती बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी दिली.

Web Title: Sindhudurg News The effect of the okhi storm swelled