स्थलांतरित मतदारांची शोधाशोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

कणकवली - ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या थेट सरपंच निवडीमुळे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या खेपेस प्रत्येक मतदाराच्या एकेक मताला महत्त्व आले आहे. प्रभाग रचना बदलल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांची चांगलीच धावपळ सुरू झाली असून, आता गावातून स्थलांतरित झालेल्या प्रत्येक उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. मुंबईत नोकरीसाठी गेलेल्या तरुण मतदारालाही गोंजारण्याचे काम उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते करू लागले आहेत. 

निवडणुकीच्या मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचाराची रंगत गावागावांत वाढली आहे. प्रचार मोहिमेसाठी सोशल मीडियाचाही वापर या खेपेस होऊ लागला असून खरी मदार ही हुकमी मतांवरच असणार आहे. त्यामुळे सरपंच पदासाठी आपले नशीब आजमावणारे उमेदवार मतदारांना आपल्या मताची गोळाबेरीज करू लागले आहेत.

या खेपेस भात कापणीचा हंगाम सुरू आहे. मात्र, पावसामुळे एकीकडे शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, दुसरीकडे प्रचारासाठी घरोघरी जाणाऱ्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. प्रत्येक उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते एका मतालाही फार मोठी किंमत द्यायला तयार झाले आहेत. त्यामुळे गावातील राजकारणाबाहेर असलेल्या स्थलांतरित मतदारांचा शोध सुरू करण्यात आला आहे. काहींनी यासाठी वेगळी टीम तयार केली आहे. 

बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांनी नवीन मतदारही केले असून असे नवीन मतदार उच्च शिक्षणासाठी बाहेर गेले आहेत. काहींच्या परीक्षा सुरू आहेत तर मुंबईत नोकरीसाठी गेलेल्यांना मतदानासाठी बोलावणे धाडले आहे. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला मतदान असल्याने प्रत्येक मतदाराला विनवणी करण्याची वेळ मतदारांवर आली आहे. गावात ज्यांची घरे आहेत आणि मतदार यादीत नावे आहेत अशी अनेक कुटुंबे शहरांकडे स्थलांतरित झाली आहेत.

गावातील लोकसंख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे प्रभागातही फारच कमी मतदान आहे. परिणामी एखाद दुसरे मतही हातातून निसटू नये यासाठी पराकाष्टा केली जात आहे. काहींनी शंभर टक्के मतदान व्हावे म्हणून प्रयत्न सुरू केला आहे. परगावातील मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय आणि रेल्वेच्या आगावू आरक्षणाची सोय केली जात आहे. प्रत्येक मतदार हा उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा आहे. या खेपेस बहुतांशी प्रभागात जोरदार टक्कर असून, थेट सरपंच निवडीमुळे प्रत्येक उमेदवार आपल्या मताची बेगमी करण्यासाठी धडपडू लागला आहे.

Web Title: sindhudurg news Grampanchayat Election