वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडीत पावसाने हाहाकार

वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडीत पावसाने हाहाकार

वैभववाडी - तालुक्‍याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शुक नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून सांगुळवाडी येथील एका रिक्षासह चार दुचाकी वाहून गेल्या; तर सांगुळवाडी पाटीलवाडी येथील साकवही पुराच्या पाण्यातून वाहून गेला. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान वाहून गेलेल्या चार दुचाकी सापडल्या. त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रिक्षा अद्याप मिळालेली नाही. 

भुईबावडा घाट परिसर, करूळ घाट परिसर आणि सह्याद्री पट्ट्यात अतिवृष्टी सुरूच आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. शुक नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली. दरम्यान वाभवे कोंडवाडी येथील शेडमध्ये सांगुळवाडी येथील काही जण आपली वाहने उभी करतात. काल देखील त्यांनी आपली वाहने शेडमध्येच उभी केली होती. परंतु शुक नदीने काल पूररेषा ओलांडली. सांगुळवाडी येथील साकव पाण्याखाली गेला. तर तेथील उंच पुलाला देखील पाणी लागले. या पुराच्या पाण्यातून शेडमध्ये उभी करून ठेवलेली वाहने वाहून गेली. संजय मारुती रावराणे यांची रिक्षा, तर प्रफुल्ल रावराणे, भालचंद्र रावराणे, महेश रावराणे, राजेंद्र रावराणे या चौघांच्या दुचाकी वाहून गेल्या. आज सकाळी दुचाकी मालकांनी शोध घेतल्यानंतर सुमारे शंभर मीटर अंतरावर चौघांच्याही दुचाकी काही अंतराच्या फरकाने आढळुन आल्या. मात्र गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उशिरापर्यत रिक्षा सापडली नव्हती. वाभवे कोंडवाडी आणि सांगुळवाडीला जोडणारा साकव पुराच्या पाण्यातुन वाहुन गेला.

शुकनदीलगत असलेली सांगुळवाडी येथील भातशेती जमीनदोस्त झाली आहे. भुईबावडा, मांगवली, कुसुर या गावातील नदीलगत असणारी सर्व शेतकऱ्यांची भातशेती वाहुन गेली आहे. मांगवली येथील मंगेश राणे यांच्या नारळ बागेचे नुकसान झाले आहे. सांगुळवाडी येथील संजय रावराणे यांच्या खळ्यातील दहा पोती भात पुराच्या पाण्यातुन वाहुन गेले.

तातडीने पंचनामे करा
सांगुळवाडी येथील सुमारे वीस ते पंचवीस हेक्‍टरवरील भातशेतीचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी सांगुळवाडीचे सरपंच प्रकाश रावराणे यांनी तहसिलदारांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com