कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग १० मध्ये उद्या मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

कणकवली - कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग १० मध्ये बुधवारी (ता. ११) मतदान होत आहे. प्रभागातून आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांतील नेतेमंडळी आणि उमेदवार कामाला लागले आहेत. इतर प्रभागांतील मतदान प्रक्रिया संपल्याने रिलॅक्‍स झालेल्या राजकीय नेतेमंडळींनी सध्या प्रभाग १० मध्ये तळ ठोकला आहे.

कणकवली - कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग १० मध्ये बुधवारी (ता. ११) मतदान होत आहे. प्रभागातून आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच पक्षांतील नेतेमंडळी आणि उमेदवार कामाला लागले आहेत. इतर प्रभागांतील मतदान प्रक्रिया संपल्याने रिलॅक्‍स झालेल्या राजकीय नेतेमंडळींनी सध्या प्रभाग १० मध्ये तळ ठोकला आहे.

शिवसेनेच्या माही मंदार परुळेकर, महाराष्ट्र स्वाभिमानच्या माधुरी सोमनाथ गायकवाड आणि भाजपच्या प्रिया अमित मयेकर यांच्यात लढत होत आहे. याच प्रभागातील शीतल मांजरेकर आणि स्वाती काणेकर यांचे अर्ज अवैध ठरले होते. त्यावरील सुनावणी प्रक्रियेला विलंब झाल्याने या प्रभागातील निवडणूक ११ एप्रिल रोजी होत आहे.

भाजप-शिवसेनेची युती झाली होती, मात्र प्रभाग १० मध्ये मैत्रीपूर्ण लढत देण्याला दोन्ही पक्षांनी तयारी दर्शवली. त्यामुळे युतीमधील शिवसेना आणि भाजपची मंडळी प्रभाग १० मध्ये स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवत आहेत. तर स्वाभिमानमधून निवडणूक लढविणाऱ्या विद्यमान नगराध्यक्ष माधुरी गायकवाड यांच्या विजयासाठी महाराष्ट्र स्वाभिमानचे कार्यकर्तेही दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. 

प्रभाग १० मध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी एकत्रित निवडणूक होत आहे. त्यामुळे नगरसेवक पदाच्या उमेदवारांनीही या प्रभागात आपला स्वतंत्र प्रचार सुरू ठेवला आहे. कणकवली नगराध्यक्षपदाची यंदाची निवडणूक अटीतटीची झाली आहे. कणकवली शहरवासीयनिश्‍चितपणे आपणालाच कौल देतील असा विश्‍वास भाजपचे संदेश पारकर, स्वाभिमानचे समीर नलावडे आणि गाव आघाडीचे राकेश राणे यांनी व्यक्‍त केला आहे. मात्र कणकवलीकर कुणाला कौल देणार हे मतदानादिवशी १२ एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे.

नगराध्यक्ष निवडणुकीतील उमेदवार तीनशे ते पाचशे मतांनी निवडून येईल, असा दावा सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींकडून केला जात आहे. यात प्रभाग १० मधील सर्वाधिक मते आपल्या पारड्यात यावीत यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी या प्रभागातील प्रचारात हिरिरीने सहभाग घेतला आहे.

नगराध्यक्षपदाची लढत अत्यंत चुरशीची झाली तर प्रभाग १० मध्ये मताधिक्‍य मिळावे यासाठी देखील श्री.पारकर आणि श्री.नलावडे जोरदार प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. सार्वत्रिक मतदानानंतर प्रभाग १० मधील ध्वनिक्षेपकावरून होणारी प्रचाराची धुळवड थांबली होती. मात्र सर्वच पक्षांनी आजपासून पुन्हा ध्वनिक्षेपकावरून प्रचार सुरू केल्याने शहरात पुन्हा एकदा निवडणुकीचा माहौल तयार झाला आहे.

Web Title: Sindhudurg News Kankavali NagarPanchayat Election