कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रभागांत उमेदवारांचा कसून शोध

कणकवली नगरपंचायत निवडणूकीसाठी प्रभागांत उमेदवारांचा कसून शोध

कणकवली - येथील नगरपंचायतीवर स्वबळाचा झेंडा फडकविण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासह शिवसेना आणि भाजप यांनी प्रत्येक प्रभागात उमेदवारांचा कसून शोध सुरू केला आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी कणकवली नगरपंचायत ही पहिलीच निवडणूक असणार आहे. त्यामुळे या पक्षाकडून उमेदवारांचा शोध आणि मतदारांची जमवाजमव आत्तापासून सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ नगरपंचायतीवर पुन्हा एकदा आपला वरचष्मा सिद्ध करण्यासाठी आणि महाराष्ट्र स्वाभिमानला तगडे आव्हान देण्यासाठी भाजपच्या संदेश पारकर यांच्याकडून ताकदवान उमेदवार निश्‍चित केले जात आहेत.

शिवसेना पक्षाकडून बारा प्रभागातील उमेदवार जवळपास निश्‍चित केले आहेत. उर्वरित प्रभागात सक्षम उमेदवार न मिळाल्यास संदेश पारकर यांच्या भाजप पक्षासमवेत युतीचा पर्याय देखील खुला ठेवण्यात आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत.

कणकवलीचा नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून जाणार आहे. यात भाजपकडून विद्यमान उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांचे नाव आघाडीवर आहे. महाराष्ट्र स्वाभिमानकडून समीर नलावडे आणि किशोर राणे, तर शिवसेनेकडून नगरसेवक सुशांत नाईक यांनी नगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, भाजप पक्षातून राजश्री धुमाळे यांनीही नगराध्यक्षपद निवडणूक लढविण्याबाबतची आपली दावेदारी कायम ठेवली आहे.

शहरातील विद्यमान नगरसेवकांपैकी सुविधा साटम, नंदिनी धुमाळे, सुमेधा अंधारी, रूपेश नार्वेकर, मेघा गांगण आदी मंडळी आपापल्या प्रभागात निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत. तर माजी नगरसेवकांपैकी भाई परब, अभय राणे, बाबू गायकवाड पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. इतर उमेदवारापैकी प्रभाग तीन मधून संदीप नलावडे, प्रभाग चारमधून संजय कामतेकर, उमेश वाळके, बाळू पारकर, प्रभाग अकरा मधून सुजित जाधव, प्रभाग बारामधून गौरव हर्णे, नंदू आरोलकर, प्रभाग तेरामधून संजय मालंडकर, प्रसाद दुखंडे, राजन परब, प्रभाग चौदामधून संजय पारकर, बाळा माणगावकर आणि प्रभाग सतरामधून प्रवीण सावंत, श्री. चव्हाण, बाबू गायकवाड आणि विलास जाधव यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.

उमेदवारांची वानवा...
शहरातील १७ प्रभागांत एक सदस्यीय पद्धतीने निवडणूक होत आहे. मात्र स्वत:च्या कार्यकर्तृत्वावर निवडून येतील, असे मोजकेच कार्यकर्ते आहेत. कणकवली महिला आरक्षित प्रभागात सर्वच पक्षांना उमेदवार शोधून त्यांना निवडणुकीत उभे करण्यासाठी प्रचंड मनधरणी करावी लागत आहे.

पारकरांना पुन्हा आग्रह...
नगराध्यक्षपदासाठी सर्वच प्रभागात प्रभाव असणारा उमेदवार कुठल्याच पक्षाकडे नाही. त्यामुळे भाजपचे युवा नेते आणि माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी नगराध्यक्षपद लढवावे, असा आग्रह राजकीय नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. पारकर यांनी मात्र आपण यापुढे आमदारकीच लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com