कणकवलीत नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून तयारी

कणकवलीत नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांकडून तयारी

कणकवली - येथे नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मार्च २०१८ मध्ये होत आहेत. त्याअनुषंगाने निवडणुकीचे पडघम शहरात वाजण्यास सुरवात झाली आहे. नगराध्यक्षपद खुले असल्याने सर्वच पक्षातील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. तर नगरसेवक पदासाठी अनेक मंडळी इच्छुक असल्याने, त्यांनी आपापल्या संभाव्य प्रभागात मतदार गाठीभेटी, स्वच्छता उपक्रम आदी कामे सुरू केली आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातूनही नगराध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आणली जात आहेत.

कणकवली नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक सन २००३ मध्ये झाली होती. यावेळी जनतेमधून संदेश पारकर हे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर पुन्हा सन २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जनतेमधून थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगराध्यक्षपदासाठी सध्या राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून समीर नलावडे, किशोर राणे, भाजपमधून कन्हैया पारकर, शिवसेनेकडून सुशांत नाईक, शेखर राणे, तर काँग्रेसमधून विलास कोरगावकर आणि बंडू हर्णे यांची नावे प्रमुख चर्चेत आहेत. तसेच शहरातील प्रमुख उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्तेही नगराध्यक्ष निवडणूक लढविण्यासाठी शहरातील बळ आजमावत आहेत. पुढील काळात निवडणुकीतील युती आणि आघाड्या, मराठा आरक्षण, तत्कालीन राजकीय परिस्थितीवर नगराध्यक्षपदासाठीच्या नावाचे चित्र निश्‍चित होणार आहे. दरम्यान शहरातील आजी माजी नगरसेवक आणि नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनीही नगरसेवक होण्यासाठी कामगिरी सुरू केली आहे.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सध्या पाणंद आणि पायवाटांची डागडुजी आणि स्वच्छता, प्रभागांमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आदी कामे करून दिली जात आहेत. दिवाळी सणात इच्छुकांनी आपल्या संभाव्य प्रभागात उटणे आणि मिठाई वाटपाचाही कार्यक्रम घेतला होता. तर सामाजिक कार्यकर्ते विलास कोरगावकर यांनी शहरात साडी, मिठाई, कंदील वाटप करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. 

नगरपंचायतीमध्ये सध्या पारकर गट, भाजप आणि शिवसेना या नगरसेवकांची युती आहे. या सत्ताधारी मंडळींकडून शहरात विविध विकास कामे सुरू करण्यासाठीचे नियोजन केले जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक घरात डस्टबिनचे वाटप आणि प्रत्येक प्रभागातील रस्त्यांवर विद्युतीकरण मिनी हायमास्ट बसविण्याचे कामांचा शुभारंभही करण्यात आला आहे.

नव्याने प्रभाग रचना...
यापूवी सन २०१३ मध्ये नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. आता मार्च २०१८ मध्ये होणाऱ्या निवडणुकीकरिता प्रभाग रचना बदलणार आहे. यात शहरात एकूण आठ प्रभाग असतील. यातील सात प्रभागात प्रत्येकी दोन तर आठव्या प्रभागात तीन सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.  प्रभाग रचना सुरू करताना उत्तर दिशेकडून ईशान्य, त्यानंतर पूर्वेकडून पश्‍चिमेकडे या प्रमाणे केली जाईल. प्रत्येक प्रभागात सरासरी ८५० मतदार असतील.

प्रवर्गनिहाय आरक्षणांची निश्‍चिती
 शहरातील आठ प्रभागांतून १७ उमेदवार निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रवर्गनिहाय आरक्षणे निश्‍चित करण्यात आली आहेत. यात पुरुष वर्गात खुल्या ५, ओबीसी २ आणि मागास प्रवर्गासाठी १ जागा निश्‍चित झाल्या आहेत. तर महिला वर्गात खुल्या ५, ओबीसी ३ आणि मागास प्रवर्गासाठी १ अशा जागा आहेत. हे प्रमाण आता १.५४ टक्‍के झाल्याने मागास प्रवर्गासाठीच्या दोन जागांचे आरक्षण शहरातील प्रभागात पडेल.

पोटनिवडणूक कुणालाच नको
शहरातील प्रभाग एक मधील ‘क’ या इतर मागास वर्ग महिला आरक्षित प्रभागात लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांची ताकद, कार्यकर्त्यांचे पाठबळ आणि नेत्यांचे कौशल्य दिसून येणार आहे. त्याचे फायदे-तोटे सार्वत्रिक निवडणुकीत होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमधून प्रभाग एक मधील पोटनिवडणूक नको असल्याचे बोलले जात आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com