खारेपाटण हसोळटेंब शाळा आजपासून बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

कणकवली - खारेपाटण हसोळटेंब येथील प्राथमिक शाळा पालकांनी आजपासून बंद ठेवली. शिक्षक कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ पालकांनी विद्यार्थ्यांना आज शाळेतच पाठवले नाही. जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे. 

कणकवली - खारेपाटण हसोळटेंब येथील प्राथमिक शाळा पालकांनी आजपासून बंद ठेवली. शिक्षक कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ पालकांनी विद्यार्थ्यांना आज शाळेतच पाठवले नाही. जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे. 

राज्यशासनाने १० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. यामुळे जिल्हा परिषदेकडे सध्या शिक्षक भरती न करता अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना सामावून घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. परिणामी जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळामध्ये शिक्षक कमी आहेत.

कणकवली तालुक्‍यातही अशीच परिस्थिती असून विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता गावातील पालकही खाजगी शाळांचा पर्याय शोधू लागले आहेत. शिक्षक कमी असल्यामुळे शिक्षण विभागाचीही मोठी अडचण निर्माण झाली आहे. जेथे मुले कमी आहेत तेथील शिक्षक कमी करून अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना शिक्षक दिले जात आहेत. याच पध्दतीने खारेपाटण हसोळटेंब येथील एक शिक्षक कमी करण्यात आला. 

परिणामी पालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत शिक्षक देणार नाही तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नाही असा निर्धार पालकांनी केल्याची माहिती सरपंच अनंत राऊत यांनी दिली. याबाबत गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. 

खारेपाटण येथील शाळा बंदच्या पार्श्‍वभूमीवर गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याशी मात्र संपर्क होवू शकलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाची नेमकी काय भूमिका आहे, हे समजू शकले नाही. 

एकाच शिक्षकाने कार्यरत राहणे सोयीचे नाही...
मुंबई -गोवा महामार्गापासून दूरवर तसेच डोंगरमय भागात ही शाळा आहे. तेथे एकाच शिक्षकाने कार्यरत राहणे सोयीचे नाही. तसेच या शाळेत सात मुलांची पटसंख्या आहे. येथे दोन शिक्षक कार्यरत होते. यातील एक शिक्षक कमी करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच डोंगराळ भागात शाळा असल्याने शिक्षक मिळावा अशी मागणी पालकांनी केली आहे.

Web Title: Sindhudurg News Kharepatan Hasoltemb school shut down