कुणकेश्‍वर यात्रेला आजपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

देवगड - कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्रीनिमित्ताने आजपासून (ता. १३) यात्रा भरत आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून येणाऱ्या भाविक यात्रेकरूंच्या स्वागतासाठी देवस्थानसह पोलिस व प्रशासन सज्ज झाले आहे.

देवगड - कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे महाशिवरात्रीनिमित्ताने आजपासून (ता. १३) यात्रा भरत आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून येणाऱ्या भाविक यात्रेकरूंच्या स्वागतासाठी देवस्थानसह पोलिस व प्रशासन सज्ज झाले आहे. यात्रेनिमित्ताने मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई अनेकांच्या नजरा वेधून घेत होती. यात्रेत विविध व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, खेळाचे साहित्य दाखल झाले आहे. 

रात्री उशिरा मंदिरात विधिवत पूजा होऊन यात्रेला प्रारंभ होईल. १५ ला समुद्रस्नानाचा योग आहे. त्या दिवशी समुद्रस्नानाने यात्रेची सांगता होईल. यात्रेसाठी मंदिर तसेच भक्‍तनिवास परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. देवस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शन मार्गावर तसेच मंदिराच्या परिसरात मंडप घालण्यात आला आहे. मंदिरावर तसेच यात्रा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्शन मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात्रा काळात आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार आहे. 

पाच देवस्वाऱ्या येणार
श्री स्वयंभू रवळनाथ (कणकवली), श्री आरेश्‍वर -पावणादेवी (आरे, ता. देवगड), श्री रवळनाथ वायंगण (मालवण), श्री जैन -पावणादेवी बाणकी लिंग हुंबरट (कणकवली), श्री देव गांगेश्‍वर -पावणाई बावशी (कणकवली) या पाच देवस्वाऱ्या आज (ता. १३) कुणकेश्‍वर भेटीला येणार आहेत.

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आपली यंत्रणा कार्यरत केली आहे. आज (ता. १३) सायंकाळी देवस्वाऱ्या भेटीला येणार असल्याने त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. यात्रेत खाजा, खाद्यपदार्थ तसेच खेळणी, कापड व अन्य साहित्याचे विक्रेते, हॉटेल व्यवसायिक दाखल झाले आहेत.

समुद्रकिनारी भेळ, आईस्क्रिम विक्रेते तसेच हॉटेल आदी स्टॉल उभारण्यात आले आहेत. तेथेही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलिस फौजफाटा कुणकेश्‍वरला दाखल होत होता. पोलिस अधिकारी बंदोबस्ताचा आढावा घेत होते. यात्रेसाठी एसटीने हंगामी आगार उभारला आहे. तालुक्‍यातील बहुतांशी सर्व भागांतून एसटीची सोय ठेवण्यात आली आहे. खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

यंदा तारामुंबरी-मिठमुंबरी पुलावरून कुणकेश्‍वरला येणारे भाविक असल्याने त्यादृष्टीनेही नियोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावरही दुकाने थाटण्याचे काम सुरू होते. कुणकेश्‍वर दर्शनासाठी आजपासूनच रांग लागली होती. रस्त्यावरील वर्दळीत वाढ झाली होती. दरम्यान, आज सायंकाळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी कुणकेश्‍वरला भेट देऊन व्यवस्थेची पहाणी केली. 

Web Title: Sindhudurg News Kunkeshwar Yatra