शाळा बंदचा निर्णय मागे घ्या - मंगेश तळवणेकर

शाळा बंदचा निर्णय मागे घ्या - मंगेश तळवणेकर

सावंतवाडी - शासनाने एक किलोमीटरच्या परिसरातील शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा. जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेता वेगळा निकष लावावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर यांनी येथे दिला.

दरम्यान,  शिक्षण मंत्री विनोद तावडे हे जिल्ह्याचे सुपुत्र आहे. त्यामुळे त्यांना जिल्ह्याची परिस्थिती आणि वेदना माहिती असणे गरजेचे होते. शासनाकडून एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील १५३ शाळा बंद होणार आहे तर ३४० शिक्षण अतिरिक्त ठरणार आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तळवणेकर यांनी  येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. 

ते म्हणाले, ‘‘सिंधुुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ भाग आहे. फणसवडे किंवा असनिये सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डोंगराळ आणि खडकाळ भाग आहे. अशा परिस्थिती त्या दहा किलोमिटरच्या आतील अंतराचा भाग दाखवून शाळा बंद केल्यास संबंधित विद्यार्थ्यावर तो अन्याय ठरणार आहे. दहा विद्यार्थ्यांचा विचार केला तर त्यातील पाच ते सहा विद्यार्थ्यांचे पालक सक्षम किंवा नाईलाजाने आपल्या मुलांना अन्य शाळेत पाठवतील; परंतु उर्वरित चार मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने शाळा बंद करण्यात येवू नये. त्यापुर्वी जिल्ह्याचा विचार करण्यात यावा आणि वेगळे निकष लावून आवश्‍यक त्या शाळा सुरू कशा राहतील याबाबत योग्य ते नियोजन व्हावे.’’

तळवणेकर पुढे म्हणाले, ‘‘या प्रक्रियेमुळे ३४० शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत; मात्र याठिकाणी भरती प्रक्रिया घेताना मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या बाहेरचे शिक्षण भरण्यात आले आहेत. त्यानंतर सुध्दा आता या नव्या निर्णयामुळे जिल्ह्यातील बरीचसे शिक्षण अतिरिक्त ठरविले जाणार आहे. त्यामुळे या विरोधात आमची भूमिका आहे. यासाठी पुढील नियोजन ठरविण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची बैठक १५ ला ओरोस येथील रवळनाथ मंदीर येथे घेण्यात येणार आहे. यावेळी पुढील भूमिका ठरविण्यात येणार असून २६ ला जिल्ह्यात शिक्षण संघटना अधिवेशनासाठी मुख्यमंत्री दाखल होणार आहे. या वेळी त्यांची भेट घेवून त्यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे.’’  याबाबत शासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही घेतलेल्या निर्णयासोबत जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना पाठिशी आहेत. त्यामुळे याबाबत योग्य ते नियोजन व्हावे, अन्यथा शासनाला जाग आणण्यासाठी मुंबई येथे आंदोलन करू, असा इशारा तळवणेकर यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com