मंत्रिपद अडवू शकत नाही - नारायण राणे

सावंतवाडी ः येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे स्वागत करताना तालुकाप्रमुख संजू परब.
सावंतवाडी ः येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे स्वागत करताना तालुकाप्रमुख संजू परब.

सावंतवाडी -‘मी राजकारणात खेळलो आहे, माझे मंित्रपद कोणी अडवू शकत नाही.  माझ्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु, सीबीआयने त्या खोट्या ठरविल्या आहेत, असे सांगून महाराष्ट्रात कोणाला घाबरलो नाही. त्यामुळे दीपक केसरकर माझ्यासमोर पिल्लू आहे,’ असा हल्लाबोल स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केला.

माझ्या कुंडल्या काढण्याची धमकी देणाऱ्याचा इतिहास माझ्याकडे आहे. यापुढे जशाच तसे उत्तर देण्यात येईल आणि माझ्यासह माझ्या पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. तसे घडल्यास मला कळवा. तासाभरात तेथे पोचेन, असे आवाहनही या वेळी राणे यांनी केले.

राणे यांनी  येथील आदिनारायण मंगल कार्यालयात मेळावा घेतला. या वेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सतीश सावंत, रेश्‍मा सावंत, संजू परब, राजू बेग, मिलिंद कुलकर्णी, अन्वर खान आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ‘‘माझी इडीकडून चौकशी सुरू आहे असे सांगून केसरकर माझी बदनामी करीत आहेत; मात्र या प्रकारामागे जिल्ह्यातील काही लोकांचा हात आहे. त्यांनीच एक दोन नव्हे, तर अनेक तक्रारी करायला लावल्या होत्या; मात्र त्या सीबीआयकडून खोट्या ठरविण्यात आल्या याचा मला आनंद आहे. माझ्यावर आजपर्यंत कोणताही गुन्हा नाही. असे असताना राजकीय दहशतवादाच्या नावाने ओरडले जाते हा सर्व प्रकार चुकीचा आहे. मुंबईचा एक राजकीय गुन्हा सोडला तर अन्य कोणताही गुन्हा माझ्या विरोधात नाही ही वस्तुस्थिती आहे; मात्र तरीही मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास आता मी गप्प बसणार नाही. थेट न्यायालयातच खेचणार आहे. पक्षाच्या आणि माझ्या विरोधात कोणी नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास कार्यकर्त्यांनी त्यांना योग्य ती जागा दाखवावी. मी तुमच्या पाठीशी आहे.’’

राणे पुढे म्हणाले, ‘‘माझ्या कुंडल्या काढण्याची धमकी देणाऱ्यांचा इतिहास माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी हुरळून जाऊ नये. खुशाल काय ते काढावे, मी त्या चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहे. केसरकर यांच्या मांत्रीक बुवाने सांगितले म्हणून माझे मंित्रपद कोणी रोखू शकत नाही. राणे जे ठरवतात ते करून दाखवितात. कोणत्याही कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत आपलाच विजय निश्‍चित आहे. त्या दृष्टीने कामाला लागा.’’
या वेळी जिल्हाध्यक्ष सामंत, श्री. सावंत, परब यांनीही आपले विचार मांडले.

परुळेकरांना राजीनामा द्यावा लागेल...
या वेळी राणे यांनी स्वीकृत नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘पात्रता नसताना मी त्यांना नगरसेवक पद दिले. ते झोपेत असताना त्यांना फोन करून माहिती दिली. त्याचे तोंड धुतले, आंघोळ घातली आणि त्यानंतर अर्ज भरायला लावला. त्यामुळे ते आता काँग्रेस प्रेमाच्या गोष्टी सांगत असतील तर ते चुकीचे आहे. त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावाच लागेल.’’

विकासकाम दाखवा, एक लाख मिळवा...
या वेळी राणे म्हणाले, ‘‘राज्यात काही वर्षांपूर्वी शासनाने एक योजना आणली होती. त्यात ‘नारू दाखवा आणि एक हजार मिळवा’ असे आवाहन होते. तशी जिल्ह्याची आज परिस्थिती झाली आहे. कोट्यवधी रुपये आणल्याचे सांगून केसरकर लोकांची दिशाभूल करीत आहेत. विकासाच्या नावाने बोंब आहे. त्यामुळे ‘विकासकाम दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा’ अशी बक्षीस योजना मी जाहीर करतो.’’

पालकमंत्री नव्हे, शोषणमंत्री...
केसरकर यांना वेळोवेळी साथ देऊन आणि निवडून आणून मी चूक केली. या वेळी कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्याकडे लक्ष दिले नाही. होय माझी चुक झाली, असे राणे यांनी सांगून ते पालकमंत्री नाही तर शोषणमंत्री आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com