काँग्रेसमध्ये कमावले नाही; उलट गमावलेच...

शिवप्रसाद देसाई
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय कारकिर्दीबाबत कायमच आक्रमक निर्णय घेतले. काँग्रेसमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णयही याचाच भाग होता. मात्र शिवसेनेत असताना राजकीय यशाचा चढता आलेख काँग्रेसमध्ये आल्यावर मात्र उतरणीला लागला. आता ते आणखी एका नव्या वाटेवर पोहोचले आहेत.

सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजकीय कारकिर्दीबाबत कायमच आक्रमक निर्णय घेतले. काँग्रेसमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णयही याचाच भाग होता. मात्र शिवसेनेत असताना राजकीय यशाचा चढता आलेख काँग्रेसमध्ये आल्यावर मात्र उतरणीला लागला. आता ते आणखी एका नव्या वाटेवर पोहोचले आहेत.

राणे आणि शिवसेना हे एकरूप झालेले नाते होते. ते शिवसेना सोडू शकतात ही कल्पनाच त्या काळात अशक्‍य वाटणारी होती. तत्कालीन काँग्रेस नेते सुधीर सावंत यांनी एकदा तसे जाहीर वक्तव्यही केले. पण त्यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. तरीही राणेंनी शिवसेना सोडली. एका रात्रीत सिंधुदुर्गातील शिवसेनेची ताकद खालसा झाली. तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर असलेली काँग्रेस नंबर वनवर पोहोचली. पण काँग्रेसमध्ये गेल्यानंतरच्या त्यांच्या प्रवासाची गोळाबेरीज केली तर राजकारणातील उतरता आलेखच पाहायला मिळतो.

शिवसेनेत असताना त्यांनी विधानसभेच्या राजकारणात मताधिक्‍याचा आलेख चढता ठेवला. नंतरच्या काळात तो जिल्ह्यात निवडणुकीच्या आधी दोन दिवस प्रचार करून ते राजकीय चित्र पालटून टाकायचे. या काळात विरोधात असलेल्या काँग्रेसला मते पडतातच कशी, असा सवाल त्यांना कायम सतावायचा. त्यांनी काही वेळा जाहिररीत्या ही सल बोलूनही दाखविली. विरोधकाला शुन्य मते पडतील इतकी राजकीय ताकद असल्याची भावना ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यावेळची राजकीय स्थिती पाहता ती फारशी अतिशयोक्तीपूर्ण होती असंही म्हणता येणार नाही.

काँग्रेसमध्ये गेल्यानंतर सुरवातीच्या निवडणुका त्यांच्यासाठी चांगल्या गेल्या. अगदी २००९ च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र डॉ. निलेश यांनी राजकारणात नवखे असूनही विस्तारलेल्या लोकसभा मतदार संघात सुरेश प्रभूंसारख्या राष्ट्रीय स्तरावर काम केलेल्या नेत्यालाही पराभूत केले. रत्नागिरीत शिवसेनेची ताकद असूनही राणेंनी ही किमया घडविली. मात्र नंतरच्या सगळ्याच निवडणुकीत राणेंचा प्रभाव राजकारणातून हळूहळू कमी होवू लागल्याचे मतांचे आकडे बोलू लागले. त्यांचे विरोधक अस्तित्व दाखवू लागले. राणेंच्या मात्र ही स्थिती लक्षात आली नाही असेच म्हणावे लागेल. कारण आपले काहीतरी चुकतेय असे त्यांना कधीच वाटले नाही.

काँग्रेसच्या कारकिर्दीत मायनिंग प्रकल्प, जैतापूर अणुउर्जा प्रकल्प, औष्णिक उर्जा प्रकल्प याचे वारे वाहू लागले. सत्ताधारी असल्याने राणेंनी याचे समर्थन केले. पर्ससीननेट आणि पारंपरिक मच्छीमारांच्या संघर्षात पर्ससीननेट धारकांना झुकते माप दिले. यामुळे मच्छीमारांमधील पारंपरिक मते त्यांच्यापासून दुरावू लागली. त्यांच्या काही समर्थकांबद्दल लोकांमध्ये असलेली नाराजी राणेंना दूर करता आली नाही. त्यांचे काही जिवाभावाचे समर्थक दुरावले. निवडणुकांमध्ये वाढलेला जीडीपी, सी वर्ल्ड, महामार्ग चौपदरीकरण, विमानतळ अशा प्रस्तावित प्रकल्पांना प्रचारात महत्व दिले जाऊ लागले. जिल्ह्यात आर्थिक उलाढालीचे स्वरुप बदलले. जमिनविक्री, त्याची दलाली याचे प्रमाण वाढले. बांधकाम व्यवसायातही मोठे बदल झाले. या सगळ्यामध्ये ठराविक लोकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला. वाढीव जीडीपीचे गणित या मुठभर लोकांकडे अचानक आलेल्या पैशाशी जोडले जावू लागले. यातील अनेकजण आपले राजकीय नाते काँग्रेसशी जोडू लागले. काँग्रेसविषयीची नाराजीही सिंधुदुर्गवासियांमध्ये घर करू लागली.

दुसरीकडे राणेंचा शब्द अंतिम मानण्याची त्यांच्या समर्थकांच्या मानसिकतेला काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या धक्के द्यायला सुरवात केली. यातून राणेंचा काँग्रेसशी असलेला संघर्ष बऱ्याचदा उफाळून आला. सिंधुदुर्गाची काँग्रेस म्हणजे राणे समर्थक अशी धारणाही घट्ट होवू लागली. विशेषतः काही राणे समर्थकांच्या स्थानिक पातळीवरील नाराजीचा थेट फटका राणेंना बसू लागला. पण ही स्थिती फार उशिरा राणेंच्या लक्षात आली. तोपर्यंत त्यांचे पुत्र निलेश यांचा लोकसभेत तर त्यांचा कुडाळ विधानसभेत पराभव झाला होता. काँग्रेसचीही सत्ता गेली होती. अनेक समर्थक विरोधकांना जावून मिळाले होते.
एकूणच राणेंचा २००५ पासून काँग्रेस सोडेपर्यंतचा प्रवास त्यांची राजकीय ताकद कमी करणाराच ठरला. अगदी शेवटी जिल्हा काँग्रेस कार्यकारीणी बरखास्तीचा प्रदेश काँग्रेसने घेतलेला निर्णय सुद्धा त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीमध्ये बार्गेनिंग पॉवर कमी करणारा ठरला.

नवे निर्णय, नवी आव्हाने
शिवसेनेवर घराणेशाहीची टीका करून राणे काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांची दोन्ही मुले हळूहळू राजकारणात सक्रीय होवू लागली. सगळ्यात आधी त्यांनी आपले ज्येष्ठ पुत्र निलेश यांना लोकसभेच्या राजकारणात आणून खासदार बनविले. त्या काळात दुसरे पुत्र नितेश मुंबईच्या राजकारणात सक्रीय होते. मात्र नंतरच्या टप्प्यात ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले. आता राणेंना केवळ स्वतः नाही तर मुलांच्या राजकीय करिअरचा विचार करूनच पुढचे निर्णय आणि वाटचाल ठरवावी लागणार आहे.