वैभववाडीत सापडली गवताची नवी प्रजाती

वैभववाडीत सापडली गवताची नवी प्रजाती

वैभववाडी - येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या परिसरात ‘डायमेरिया’ या जीन्‌समधील नवीन प्रजाती आढळून आली आहे. हे गवत ‘डायमेरिया आनंदीबाई’ नावाने ओळखले जावे, असा प्रयत्न ही प्रजाती शोधणारे प्रा. डॉ. व्ही. ए. पैठणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी त्या संदर्भात दिल्ली विद्यापीठाकडे सादरीकरण केले आहे. गेल्यावर्षी श्री. पैठणे यांनी आर्चिणेच्या माळारानावर ‘इरिओकोलॉन देवेंद्रनी’ या वनस्पतीचा शोध लावला होता.

कोकण म्हणजे दुर्मीळ वनस्पती आणि वनौषधीचा खजिना मानला जातो. कोकणातील जंगलामध्ये नानाविध दुर्मीळ वनस्पती आढळून आल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, याच कोकणात गवताच्या शेकडो प्रजाती आहेत; मात्र याबाबत संशोधन करणारी यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे शेकडो दुर्मीळ गवताच्या प्रजाती दुर्लक्षित आहेत. 

या गवताच्या प्रजातीवर गेले वर्षभर प्रा. पैठणे, प्रा. काशेट्टी, प्रा. पाटील यांनी संशोधन केले. या संशोधनाकरिता त्यांना नाशिक येथील वनस्पतीतज्ज्ञ प्रा. विनोदकुमार गोसावी, प्रा. आलोक चोरगे यांची मदत झाली.

प्रा. पैठणे यांनी हे नवीन संशोधन आनंदीबाई रावराणे यांना समर्पित केले आहे. या गवताला ‘डायमेरिया आनंदीबाई’ असे नाव मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात दिल्ली विद्यापीठाच्या इंडियन असोशियन फॉर एन्जीओस्पर्मसमोर त्यांनी या गवताचे सादरीकरण केले आहे. या गवताला त्यांच्याकडून मान्यता मिळाल्यास हे गवत ‘डायमेरिया आनंदीबाई’ या नावाने ओळखले जाणार आहे. तसे घडल्यास वैभववाडी महाविद्यालयाच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.

गेल्यावर्षी आर्चिणेच्या माळारानावर डॉ. पैठणे यांना इरिओकोलॉन देवेंद्रनी या दुर्मीळ वनस्पती आढळुन आली होती. ही वनस्पती केरळमध्ये आढळुन येते. त्यानंतर आता नव्या गवताच्या जातीचे संशोधन केले आहे. संशोधनाकरीता पुरेसा वेळ आवश्‍यक असतो. प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्यामुळेच हे करणे शक्‍य होत असल्याचे श्री. पैठणे यांनी आवर्जुन सांगीतले.

दुर्मिळ गवताच्या जातीचा खजिना
डेअरी उद्योगात चाऱ्याला अतिशय महत्व आहे. गवताच्या रूपाने जनावरांसाठी चारा सहज उपलब्ध होतो. गवताच्या शेकडो प्रजाती जिल्ह्यात आहेत. जंगलनिर्मितीची सुरूवात सुद्धा लहान-लहान गवतांपासूनच होते. परंतु गवतावर संशोधन करणारांची संख्या अतिशय कमी आहे. संशोधनाला पुरेसा वेळ लागत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. ऑक्‍सिजनची निर्मिती करण्यात गवत महत्वाची भुमिका बजावते असे मत डॉ. पैठणे, प्रा. काशेट्टी, प्रा. पाटील यांनी व्यक्त केले.

पक्ष्याच्या चोचीप्रमाणे आकार...
येथील आनंदीबाई रावराणे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. व्ही. ए. पैठणे, प्रा. आर. पी. काशेट्टी, प्रा. एस. बी. पाटील यांना महाविद्यालयानजीकच्या डोंगरावर ‘डायमेरिया’ या जीन्‌समधील फॅमिली पोएसीसारखी दिसणारी गवताची प्रजाती आढळून आली. या गवताच्या दोन प्रजाती आहेत. त्यापैकी एक गवताची जात ही खंडाळा भागात आढळून येते. दुसरी संपूर्ण महाराष्ट्रात आढळते. परंतु, वैभववाडीत आढळून आलेली ही गवताची प्रजाती त्या दोन गवत प्रकारासारखी दिसत असली तरी त्यामध्ये वेगळेपण दिसून आले आहे. या गवताच्या फुलाचा (ग्लुम) आकार पक्ष्यांच्या चोचीप्रमाणे दिसतो. त्यांची उंची सुमारे आठ ते बारा मिलिमीटर इतकी आहे, तर गवताची उंची ६० ते ७० सेंटीमीटर इतकी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com