नीलेश राणे, आव्हान पेलणार का?

नीलेश राणे, आव्हान पेलणार का?

सावंतवाडी -‘शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करेपर्यंत दाढी काढणार नाही’, असा पण माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी केला; पण सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता तो पूर्ण करण्याचे आव्हान तितकेसे सोपे नाही. राणे काँग्रेसमधून लढणार, की भाजपमधून, की आणखी तिसरा पर्याय उभा राहणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी निवडणुकीआधी दोन वर्षे त्यांनी केलेला हा पण पूर्ण करण्यासाठी केवळ तेच नाहीत, तर नारायण राणेंनाही पूर्ण ताकद लावावी लागणार, इतके नक्की.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ अस्ताव्यस्त पसरला आहे. याच्या एका टोकापासून (दोडामार्ग) दुसऱ्यापर्यंत (चिपळूण) पोचायलाच एक दिवस लागतो. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीत २००९ मध्ये नीलेश राणे विजयी झाले होते; पण तेव्हा शिवसेना कमजोर होती. राणेंची राजकीय ताकद पूर्ण क्षमतेने होती. २०१४ च्या निवडणुकीत मात्र संघटनात्मक कौशल्य असलेल्या विनायक राऊत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली.

काँग्रेसवरील नाराजी, राणेंची तुलनेत कमी झालेली राजकीय ताकद आणि काही प्रमाणात मोदी लाट यांच्या जोरावर राणेंचा राऊत यांनी दीड लाखाच्या मताधिक्‍याने पराभव केला. राणेंसाठी हा धक्का होता. यानंतर नीलेश राणे सिंधुदुर्गाच्या राजकारणात फारसे सक्रिय राहिले नाहीत. रत्नागिरीत काँग्रेस वाढवण्यासाठी मात्र प्रयत्न सुरूच ठेवले; परंतु प्रदेश काँग्रेसने त्यांना फारशी साथ दिली नाही. त्यावरून त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. या सगळ्या प्रवासात त्यांच्या वाढवलेल्या दाढीचे मात्र कार्यकर्त्यांना कुतूहल होते. यामागचे गुपित त्यांनी सोमवारी (ता. १८) कुडाळमधील मेळाव्यात उघड केले. ‘विनायक राऊत यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव करणार नाही, तोपर्यंत दाढी काढणार नाही’, अशी प्रतिज्ञा करून समर्थकांचे पाठबळ मिळवले; पण हे आव्हान तितकेसे सोपे नक्कीच नाही.

या मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघांचा विचार करता सद्यस्थितीत पाच आमदार शिवसेनेचे, तर काँग्रेसकडे एक आमदारपद आहे. पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास रत्नागिरीत काँग्रेसची स्थिती खूपच नाजूक आहे. सिंधुदुर्गात मात्र राणे समर्थक काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भक्कम स्थितीत आहेत. सत्तेत आल्यापासून भाजप संघटनात्मक पातळीवर वाढत असली तरी याला सध्या तरी मर्यादा आहेत. नारायण राणेंनी काँग्रेसशी फारकत घेण्याची मानसिकता जवळपास तयार केली आहे. ते भाजपमध्ये जातात की आणखी वेगळा पर्याय निवडतात यावरही लोकसभेची पुढची गणिते ठरणार आहेत. विधानसभा मतदारसंघवार राजकीय बलाबलाचा विचार केल्यास साधारण असे चित्र आहे.

कुडाळमधील गणिते
कुडाळ हा मतदारसंघ नारायण राणेंचा मानला जातो; मात्र गेल्या निवडणुकीत राणेंचा इथे १० हजार मतांनी पराभव झाला. आताही काँग्रेस गतवैभवापर्यंत पोचली नसल्याचे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवरून दिसले. अर्थात या मतदारसंघातील मालवण तालुका राणेंसाठी जमेची बाजू ठरणारा म्हणावा लागेल. अलीकडे नीतेश राणे यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या बाजूने घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते. अर्थात राणे भाजपमध्ये गेल्यास मूळ काँग्रेसची मते त्यांच्यापासून दुरावण्याची शक्‍यता आहे. तो बॅकलॉग त्यांना भाजपमध्ये मूळ मतांमधून भरून काढावा लागणार आहे.

राजापुरातील लढाई
राजापूर हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. आता मात्र राजन साळवींनी येथे शिवसेनेला अव्वल स्थानी नेले. सध्या असलेली काँग्रेस गटा-तटात विभागलेली आहे. येथे राणे समर्थकांचा गट आहे. भाजपची स्वतंत्र ताकद असली तरी ती मर्यादित आहे. त्यामुळे सिंधुदुर्गाच्या शेजारी असलेल्या या विधानसभा मतदारसंघातही राणेंना खूप मोठे संघटनात्मक काम उभे करावे लागणार आहे.

सावंतवाडीतील स्पर्धा
गेल्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर फॅक्‍टरमुळे सावंतवाडी मतदारसंघ चर्चेत आला होता. आता केसरकरांकडे शिवसेनेने पालकमंत्रिपद दिले आहे. या मतदारसंघात राणेंना मानणारा वर्ग आहे. राणे भाजपमध्ये गेल्यास त्यातील कितीजण त्यांच्यासोबत जाणार आणि मूळ काँग्रेसची मते आपल्याकडे वळविण्यात ते किती यशस्वी ठरणार यावर मतांची गोळाबेरीज ठरणार आहे. भाजपची येथे बांदा, दोडामार्ग अशी काही मोजकी पॉकेट वगळता फारशी ताकद नाही. राणेंचे विरोधक राजन तेली सध्या या भागाचे भाजपकडून नेतृत्व करत आहेत. लोकसभेत भाजपच्या तिकिटावर जिंकायचे असल्यास या दोघांना जुळवून घ्यावे लागणार आहे. काँग्रेसतर्फे लढायचे झाल्यास येथे त्यांच्यासमोर शिवसेनेचे मुख्य आव्हान असणार आहे.

चिपळूणमधील आव्हान
चिपळूणमध्ये सद्यस्थितीत शिवसेनाच चांगल्या स्थितीत आहे. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी, काँग्रेस यांचा नंबर लागतो. काँग्रेसमध्ये राणेंना मानणारा गट आहे. अर्थात राणे भाजपमध्ये गेल्यास त्यातील कितीजण सोबत जाणार हा प्रश्‍न आहे. येथे भाजपचा पाया तितकासा भक्कम नाही; मात्र सत्ता आल्यानंतर भाजप वाढू लागली आहे. असे असले तरी अलीकडेच येथील तालुका कार्यकारिणी व इतर संघटनात्मक पदे भरली गेली. त्यामुळे नव्याने कार्यकर्ते आले तर त्यांना स्थानिक पातळीवर कोणती पदे दिली जाणार हा प्रश्‍न आहे. राणे काँग्रेसमध्ये राहिले तरी येथील संघटनात्मक स्थिती तितकीशी भक्कम नाही. त्यामुळे विजय मिळवायचा झाल्यास राणेंना खूप काम करावे लागणार आहे.

रत्नागिरीत संमिश्र चित्र
रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत यांच्यामुळे शिवसेना भक्कम स्थितीत आहे. असे असले तरी त्यांच्यात अंतर्गत नाराजी आणि गटबाजी आहेच. काँग्रेस, राष्ट्रवादी यांची संघटनात्मक स्थिती फारशी चांगली नाही. भाजप मात्र पूर्वीपासून येथे रुजलेली आहे. तरीही त्यांच्यात अंतर्गत नाराजी आहेच. राणेंनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतल्यास काँग्रेसमधील किती समर्थकांना ते सोबत नेणार आणि भविष्यात लोकसभेच्या वेळी शिवसेनेतील किती नाराजांची मते आपल्याकडे वळवू शकणार यावर बरीच गणिते अवलंबून असणार आहेत. शिवाय भाजपच्या मूळ संघटनेशी जुळवून घेण्याचे आव्हानही असेल. काँग्रेसमध्ये राहून लढले तर सद्यस्थितीत इथली स्थिती नाजूक आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीची साथ होती; मात्र यावेळी उदय सामंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद बऱ्यापैकी कमी झाली आहे.

कणकवलीतील ताकद
कणकवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद राणेंसाठी सर्वाधिक जमेची बाजू ठरू शकते. या मतदारसंघात विद्यमान आमदार नीतेश राणे आहेत. त्यांची मुख्य स्पर्धा भाजपशी आहे. राणे भाजपमध्ये गेल्यास या मतदारसंघात त्यांची ताकद खूप जास्त प्रमाणात वाढणार आहे. अर्थात शिवसेनेने या ठिकाणी अरुण दुधवडकर यांना भविष्यातील विधानसभेचे उमेदवार म्हणून पुढे आणायला सुरवात केली आहे. या ठिकाणी भाजपमध्ये गेल्यास राणेंना मूळ भाजपची मते आपल्याकडे मिळवण्यासाठी राजकीय कसब वापरावे लागणार आहे. काँग्रेसमध्ये राहूनच लढत झाली तरी हा मतदारसंघ त्यांना बऱ्यापैकी साथ देऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com