अश्‍लील संदेश पाठविणाऱ्यास चोप

अश्‍लील संदेश पाठविणाऱ्यास चोप

दोडामार्ग - नातेवाइकाच्या मोबाईल दुकानात रिचार्ज करण्यासाठी गेलेल्या मुलीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर अश्‍लील मेसेज करणाऱ्या परप्रांतीय युवकाला स्थानिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. तो युवक आपल्या नातेवाइकाच्या सुपर मार्केटमध्ये कामाला आहे. दरम्यान, मोबाईल दुकानचालकाला स्थानिकांनी पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन त्यालाही पोलिस ठाण्याबाहेरच चोप देऊन हात साफ करून घेतले. 

परप्रांतीयाकडून अशा प्रकारची आगळीक घडल्याने स्थानिक युवक संतप्त झाले होते. त्यांनी पोलिस ठाणे गाठत संबंधित युवक उद्या बाजारात दिसता नये, त्याला मूळ गावी पाठवा, अशी मागणी केली. त्याच्या काकानेही त्याला इथे ठेवणार नाही; पण प्रकरण मिटवा, अशी विनंती पोलिस आणि गावकऱ्यांकडे केली. या वेळी संबंधित मुलगी आणि ती काम करत असलेल्या दुकानाचा मालकही पोलिस ठाण्यात हजर होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोडामार्ग-तिलारी मार्गावर बाजारपेठेत पंचायत समितीच्या बाजूला एक सुपर मार्केट आहे. त्याच्याच बाजूला एक मोबाईल शॉपी आहे. दोन्ही दुकाने परप्रांतीय व्यापाऱ्यांची आहेत आणि ते एकामेकांचे नातेवाईक आहेत. सुपर मार्केटमध्ये काम करणारा भवानी दुर्गसिंघ पुरोहित (वय २०) मोबाईल शॉपीवाल्याचा नातेवाईक आहे. संबंधित युवती चार दिवसांपूर्वी रिचार्ज मारायला त्याच्याकडे गेली होती. त्या दुकानदाराने तो फोन नंबर भवानीला दिल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने सतत तिला मेसेज करणे सुरू ठेवले.

शेवटी कंटाळून तिने ती गोष्ट दुकान मालकाला सांगितली. त्याने मग तो मोबाईल ऑपरेट करण्यास सुरवात केली. त्यामुळे दोघांचे संभाषण सुरू झाले. त्यातून त्याचा हेतू स्पष्ट झाला. त्यानंतर स्थानिक युवकांसोबत त्यांनी सुपर बाजार गाठून त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथे त्या युवतीने घडलेली हकीकत पोलिस निरीक्षक सुनील घासे आणि वाहतूक पोलिस राजा राणे यांना दिली. त्यांनी नातेवाइकांना बोलावून आणले; मात्र त्यातील महिला नातेवाईक स्थानिकांना उद्धट उत्तरे देत होती. त्यामुळे प्रकरण तापले; पण पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले. त्यानंतर त्यांनी संबंधित मोबाईल शॉपीवाल्या युवकाला बोलावून घेतले. त्या वेळी स्थानिकांनी त्यालाही चोप दिला. चौकशीत त्याने भवानीला आपण नंबर दिला नाही, असे सांगितले. दरम्यान, उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात स्थानिक आणि परप्रांतीय यांची गर्दी होती.

आणखी काहींना ‘ब्लॅकमेल’ केल्याची चर्चा
कोपर्डीचा निकाल आज लागला आणि आजच इथल्या युवतीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे त्या युवकांचे कारनामे जगासमोर आले. त्यांनी अशाप्रकारे आणखी काही युवती आणि महिलांना ‘ब्लॅकमेल’ केल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांना सोडून देण्याऐवजी कारवाई करायला हवी होती, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com