कर्तव्यतत्पर पोलिसांना माफीचा सल्ला

कर्तव्यतत्पर पोलिसांना माफीचा सल्ला

बांदा - येथील तपासणी नाक्‍यावर पोलिसांनी गाडी तपासताना गैरवर्तन केल्याचा आरोप इचलकरंजीतील एकाने केला आणि तपासणी नाक्‍यासमोरच ठिय्या मांडला. पोलिस निरीक्षकांनी आपल्याच कर्मचाऱ्यांना माफी मागण्याचा सल्ला दिला. याबद्दल तीव्र उद्विग्नता व्यक्त करतानाच एक पोलिस कर्मचारी रक्तदाब वाढल्याने तेथेच कोसळला. हा प्रकार आज सायंकाळी घडला.

तेथील तपासणी नाका अनेक कारणांनी चर्चेत असतो; मात्र आज घडलेला प्रकार त्यापेक्षा वेगळा होता. इचलकरंजी येथील अजित अशोक भोरे (वय ४८) हा दुपारी अडीचच्या दरम्यान आपल्या आलिशान गाडीतून गोव्यातून इचलकरंजीकडे जात होता. पोलिसांनी तपासणीसाठी गाडी थांबवली. गाडीच्या काचा काळ्या होत्या. पोलिसांनी त्या खाली करण्यास सांगितल्या. काचा काळ्या असल्याने २०० रुपये फाईन भरण्याची सूचना केली.

यावेळी तेथे सहायक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ सावंत यांच्यासह महेश भोई, जी. के. पालकर कार्यरत होते. भोरे याने पोलिसांवर आरोप केला. गाडीत आपले कुटुंबीय आहे आणि पोलिसांनी आत डोकावून पाहिले. हे गैरवर्तन असल्याचे त्याचे म्हणणे होते. गाडी तेथेच लावून भोरेने तपासणी नाक्‍यासमोर ठिय्या सुरू केला. त्या पोलिसांवर निलंबन कारवाई करा; अन्यथा त्यांनी माफी मागावी, अशी मागणी त्याने केली.
या प्रकारानंतर तेथे वाहनचालक, स्थानिक जमा झाले.

पोलिसांनी भोरे याची मद्यप्राशनाविषयी तपासणी केली असता तिही पॉझिटिव्ह आली. त्यासाठीही दंड ठोठावला. येथील पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर कामानिमित्त बाहेर होते. त्यांना कळवताच ते तपासणी नाक्‍यावर पोचले. त्यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी त्या पोलिसांनाच माफी मागण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या भूमिकेने पोलिस कर्मचारी संभ्रमात पडले. गाडी तपासणी हे पोलिसांचे कामच आहे. त्यामुळे माफी मागणे योग्य आहे का, असा प्रश्‍न त्यांना पडला. सहायक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ सावंत यांनी याबाबत उद्विग्न होत तेथेच आपल्याला मिळालेले मेडल काढून टाकले. त्यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यांना अचानक उच्चदाबाचा त्रास सुरू झाला. ते तेथेच कोसळले. त्यांना तातडीने येथील आरोग्य केंद्रात आणण्यात आले. रक्तदाब वाढल्याने ते कोसळल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर या प्रकरणावर पडदा पडला.


या प्रकरणी भोरे यांच्यावर इतर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मद्यप्राशन व काळ्या काचांसंदर्भात दंड करण्यात आला आहे.
- जयदीप कळेकर, पोलिस निरीक्षक, बांदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com