वर्षा पर्यटनासाठी आंबोली सज्ज

वर्षा पर्यटनासाठी आंबोली सज्ज

आंबोलीचे सौंदर्य
आंबोली हे गाव राज्यातल्या जवळपास सगळ्यांच्या ओळखीचे म्हणावे लागेल. राज्यात सर्वाधिक पाऊस पडणारे हे ठिकाण सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमधून आलेल्या ब्रिटीशांनाही भुरळ पाडणारे ठरले होते. त्यांनी याला हिलस्टेशनचा दर्जा दिला. सावंतवाडी संस्थानचा देखणा राजवाडा या आंबोलीत आजही आहे. संस्थानची ही हिवाळ्यातली राजधानी. इथले पर्यटन महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणारे ठरले आहे. निसर्गसंपन्न परिसर, जैवविविधता, भरपूर पाऊस, अशा कितीतरी गोष्टी आंबोलीत येणाऱ्यांना भुरळ पाडतात.

वर्षा पर्यटनाची ‘क्रेझ’
अगदी १९८० पासून पर्यटक येथे येत असल्याचे संदर्भ मिळतात. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहिर झाल्यानंतर आंबोली हे पर्यटन विकासाचे प्रमुख केंद्र बनले. १९९७-९८ पासून येथे वर्षा पर्यटनाची क्रेझ सुरु झाली. सुरवातीला कुटुंबवत्सल पर्यटक यायचे. गोवा-मुंबईतील पर्यटकांची संख्या जास्त असायची. २००५-०६ नंतर मात्र वर्षा पर्यटनाला गर्दी होवू लागली. थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे बारमाही पर्यटन अपेक्षित आहे. त्या दृष्टीने स्थानिक व्यावसायिक, ग्रामस्थ यांचे प्रयत्नही असतात; मात्र वर्षा पर्यटन हा इथला सगळ्यात मोठा हंगाम. साधारण पावसाळा सुरू झाल्यानंतर श्रावण महिना लागेपर्यंतच्या दीड-दोन महिन्यात येथे हजारो पर्यटक येतात. येथील पर्यटन व्यावसायिकांच्या दृष्टीने आर्थिक उलाढालीचा हाच महत्वाचा कालावधी मानला जातो. यामुळे वर्षा पर्यटनाच्या सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने देणे हा इथला प्राधान्यक्रम म्हणायला हवा. असे असले तरी येथील पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याच्या घोषणा राजकीय नेत्यांकडून वारंवार होत आहेत. आतापर्यंत करोडो रुपये येथील सुविधांसाठी खर्चही झाले; मात्र आंबोलीचा पर्यटन विकास जागचा हाललेला नाही. यंदा वर्षा पर्यटनाला अपेक्षेपेक्षा आधी सुरूवात झाली आहे. पहिल्याच टप्प्यात मुसळधार पाऊस झाल्याने धबधबे प्रवाहीत झाले आहेत. गेले चार दिवस पावसाचे प्रमाण कमी आले तरी वर्षा पर्यटनाची चाहूल लागली आहे.

प्रशासन सज्ज
या धबधब्यावर आनंद घेण्यासाठी शनिवारीपासून गर्दी सुरू झाली आहे. या काळात धबधबा परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. बांधकाम विभागाही अलर्ट आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्यांचे पथक तात्काळ दाखल होणार आहे, असा दावा बांधकाम विभागाने केला. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम यांच्या मदतीने अनेक सुविधा दिल्या आहेत. यात घाटात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी महत्वाच्या ठिकाणी आणी पर्यटन स्थळावर पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. तळीरामावर कारवाई करण्यात येणार आहे. अतिवृष्टी झाल्यास घाटातील संवेदनशील भाग कोसळू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन विशेष दक्षता घेतली आहे. कोणताही भाग खचल्यास कींवा दरडी कोसळल्यास तात्काळ कर्मचारी उपलब्ध करुन दिले जाणार आहे, अशी माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली 

पोलिस कुमक तैनात
आंबोली घाटात येणाऱ्या अतीउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न असणार आहेत. त्यासाठी दिडशेहून अधिक पोलिस,अधिकारी आणी वाहतूक नियंत्रंणासाठी असतील. ही कुमक सुट्‌टीच्या काळासाठी आहे. बेळगाव, कोल्हापुरहून आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांसाठी आंबोलीतील एमटीडीसीच्या ठिकाणी पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याच बरोबर प्रत्येक पर्यटन स्थळावर पोलिस कुमक ठेवण्यात येणार आहे. अपघाताच्या परिस्थितीत स्थानिक नागरीक आणि हॉटेल चालकांची मदत घेण्यात येणार आहे. 

वन विभागाकडूनही तयारी
बहुसंख्य पर्यटनस्थळे वन विभागाच्या क्षेत्रात येतात. त्यांनीही वर्षा पर्यटनाची तयारी केली आहे. आंबोली मुख्य धबधबा तसेच कावळेसाद पॉईट आदी ठिकाणी पर्यटकांना थांबण्यासाठी आणि बसण्यासाठी वन विभागाकडुन विशेष व्गवस्था केली आहे. कावळेसाद परिसरात सिमेंटचे बेंच बसवाले आहेत. कचरा होवू नये म्हणून आर्कषक कचरा पेट्या बसविण्ल्या आहेत.

आपत्कालीन परिस्थितीसाठी आम्ही अलर्ट आहोत. दरवर्षी प्रमाणे आमची यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध संरक्षक कठडे दरडी आणि झाडे कोसळल्यानंतर वाहतूक खोंळबणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
- युवराज पाटील,
कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग

आंबोलीची जैवविविधता
सापांचे प्रकार    ३१
बेडकांचे प्रकार    २६
पक्ष्यांचे प्रकार    १६०
रानफुलांचे प्रकार    १४०
फुलपाखरांचे प्रकार    १६०
वनौषधींचे प्रकार    ७००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com