सिंधुदुर्गात समुद्र पुन्हा खवळला

सिंधुदुर्गात समुद्र पुन्हा खवळला

मालवण - सिंधुदुर्ग जिल्ह्यात वातावरणामध्ये पुन्हा बदल जाणवू लागले आहेत. गेले चार ते पाच दिवस उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने समुद्र प्रचंड खवळला आहे. यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात इतरत्र स्वच्छ वातावरण असलेतरी उष्म्याची तीव्रता वाढली आहे. वारंवार बदल जाणवू लागल्याने मच्छीमारांबरोबरच शेतकरीही अस्वस्थ आहेत.

जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी अवकाळी पाऊस आणि दमट वातावरणाचा फटका बसला होता. यानंतर वातावरण काही प्रमाणात निवळले; मात्र गेल्या चार दिवसांपासून किनारपट्टीवरील वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढला आहे. स्थानिक मच्छीमार याला उपरचे वारे असे संबोधतात. यामुळे समुद्र प्रचंड खवळला आहे. एरव्ही समुद्रात वाऱ्याचा वेग 20 ते 25 किलोमीटर प्रतितास असा असतो. तो 55 ते 60 किलोमीटरवर पोहोचला आहे. यामुळे किनारपट्टी भागात काही ठिकाणी पडझडीचे प्रकारही घडले. 

समुद्र खवळल्याचा सर्वाधिक फटका मासेमारी क्षेत्राला बसला आहे. बहुसंख्य मासेमारी ठप्प आहे. काही मच्छीमार वातावरण बघून मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत; मात्र ऐन हंगामात हा बदल झाल्याने पारंपारिक मच्छीमार सर्वाधिक अडचणीत आहेत.

जिल्ह्यातील इतर भागात वातावरण स्वच्छ आहे; मात्र गेल्या चार दिवसात उष्म्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. कमाल तापमान 38 अंशापर्यंत पोचले आहे. समुद्रातील वातावरण बदलामुळे पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाल्यास त्याचा फटका बागायतीला बसू शकतो. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे.

स्कुबा डायव्हींग थंडावले
सध्या सागरी पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा हंगाम सुरु आहे. स्कुबा डायव्हींग आणि स्नॉर्कलिंग याचे पर्यंटकांना विशेष आकर्षण असते; मात्र समुद्र खवळल्याने या दोन्ही गोष्टी बंद आहेत. याचा पर्यटन हंगामाच्या आर्थिक उलाढालीवरही परिणाम होत आहे.

देवबागमध्ये दाणादाण
वादळी वाऱ्यामुळे देवबागमध्ये किरकोळ नुकसानीचे प्रकार घडले आहेत. देवबागच्या किनाऱ्यावर मासेमार नौका स्थिरावल्या आहेत. सागरी पोलिसांना सावधगिरीच्या सूचना आल्या आहेत. समुद्र गस्तीनौकाही बंदरात आणण्यात आल्या आहेत. देवबाग भाटकरवाडी येथे एका घरावर माड कोसळून नुकसानीचा प्रकार घडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com