शाळा इमारतींचे स्ट्रक्‍चर ऑडिट होणार

शाळा इमारतींचे स्ट्रक्‍चर ऑडिट होणार

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील २००० सालापूर्वी बांधलेल्या शाळा इमारतींचे स्ट्रक्‍चर ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती आजच्या जिल्हा परिषद शिक्षण समिती सभेत देण्यात आली. यावेळी कृषी प्रदर्शनाच्या धर्तीवर सिंधू शैक्षणिक मार्गदर्शन व प्रदर्शन येत्या एप्रिलमध्ये घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील १ जानेवारी २००० पूर्वीच्या सर्व शाळा इमारतीचे स्ट्रक्‍चर ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून २००० पूर्वीच्या शाळा इमारतीची यादी तयार करण्यात येणार आहे. यादी तयार होताच बांधकाम विभागामार्फत स्ट्रक्‍चर ऑडिटचे काम केले जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांनी दिली.

जिल्ह्यात यशस्वीपणे आयोजित होत असलेल्या सिंधू पशू-पक्षी प्रदर्शनाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी व शैक्षणिक विकास साधण्यासाठी शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात सिंधू शैक्षणिक मार्गदर्शन व प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे. एप्रिलमध्ये हे प्रदर्शन घेण्याबाबतचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी आज दिली.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. या वेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी गजानन गणबावले, सदस्य सरोज परब, राजन मुळीक, संपदा देसाई आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअरची संधी मिळावी, त्यांना शैक्षणिक दिशा योग्य मिळावी यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागमार्फत सिंधू कृषी पशु-पक्षी प्रदर्शनाच्या धर्तीवर सिंधू शैक्षणिक विकास मार्गदर्शन व प्रदर्शन आयोजित करण्याचा मानस आहे. 

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना ५० टक्के अनुदानावर क्रीडा साहित्य पुरविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रशाळा व मोठ्या पटसंख्येच्या शाळांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही योजना राबविताना ५० टक्के लोकसहभाग महत्त्वाचा आहे अशी माहिती सभेत देण्यात आली. जिल्ह्यात शिक्षकांना आवश्‍यकतेनुसार तातडीची नियुक्ती व तात्पुरती नियुक्ती देण्याचे अधिकार देण्याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तोपर्यंत तात्पुरत्या गैरसोयी दूर करण्याच्यादृष्टीने आवश्‍यकत्या वेळी तात्पुरत्या नियुक्तीचे अधिकार देण्यात अाले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी गजानन गणबावले यांनी शिक्षण समिती सभेत दिली.

जिल्ह्यातील १४५५ शाळांपैकी सुमारे ३५२ शाळांमध्ये सद्यस्थितीत शौचालयासाठी व पिण्यासाठी पाण्याची सोय उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे शौचालयाचा वापर करणे, पोषण आहार शिजवणे अडचणीचे ठरत आहे. जिल्ह्यातील देवगड- ६३, कणकवली-१३, मालवण-२३, सावंतवाडी-२३, वैभववाडी-३१, कुडाळ-१४५, वेंगुर्ले-३८ तर दोडामार्गमधील १६ शाळांमध्ये सद्य:स्थितीत पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था नसल्याचे सभेत सांगण्यात आले तर जिल्ह्यातील पाच शाळांमध्ये कोणताही पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याचेही या वेळी सांगितले.

जिल्ह्यातील पाण्याची सुविधा नसलेल्या शाळांची यादी तयार करुन तेथे पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील. त्यासाठी लागणारा निधी याबाबत परिपूर्ण अहवाल सादर करावा, अशी सूचना सभापती राऊळ यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com