वैभववाडीमध्ये वर्षभरात एकाही चोरीचा उलगडा नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

वैभववाडी - रात्रीच्या नव्हे तर भरदिवसा झालेल्या चोऱ्यांचा तपास करण्यात येथील पोलिसांना आजमितीस यश आलेले नाही. चोरी झाल्यानंतर सुरुवातीचे तीन-चार दिवस घरातील आणि आजूबाजूच्या लोकांची माहिती घेतात. त्यानंतर तपासात कोणतीच प्रगती दिसत नाही. वर्षभरात झालेल्या एकाही चोरीचा उलगडा झाला नसल्यामुळे तालुक्‍यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे.

वैभववाडी - रात्रीच्या नव्हे तर भरदिवसा झालेल्या चोऱ्यांचा तपास करण्यात येथील पोलिसांना आजमितीस यश आलेले नाही. चोरी झाल्यानंतर सुरुवातीचे तीन-चार दिवस घरातील आणि आजूबाजूच्या लोकांची माहिती घेतात. त्यानंतर तपासात कोणतीच प्रगती दिसत नाही. वर्षभरात झालेल्या एकाही चोरीचा उलगडा झाला नसल्यामुळे तालुक्‍यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर बनल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे.

तालुक्‍यात गेल्या वर्षभरात अनेक चोऱ्या झाल्या. कोकिसरे नारकरवाडी येथे दोनदा चोरी झाली. तर वैभववाडी बाजारपेठेतील आठ दुकानगाळे एका रात्रीत फोडण्यात आले. याशिवाय नाधवडे, भुईबावडा, आचिर्णे आणि अलीकडेच एडगाव येथील शहीद विजय साळसकर यांचा बंगला चोरट्यांनी फोडला. या सर्व चोऱ्या रात्रीत केल्या. यापैकी एकाही चोरीचा तपास आजमितीस झालेला नाही.

चोरी झाल्यानंतर पोलिस दुसऱ्यादिवशी सकाळी घटनास्थळी जातात. पंचनामा केल्यानंतर श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करतात. घरातील किंवा आजूबाजूच्या लोकांचे जबाब घेतले जातात. कुणावर संशय आहे का? असे घरमालकाला विचारले जाते. त्यानंतर तपास काय करतात ते पोलिसांनाच माहिती असावे. वर्षभरात रात्री झालेल्या एकाही चोरीचा तपास झालेला नाही.रात्रीच्या अनेक चोऱ्या झाल्या; परंतु वर्षभरात भरदिवसा धाडसी तीन चोऱ्या झाल्या. एडगाव फौजदारवाडी नानिवडे आणि अलीकडेच तिथवली दिवशी येथे भरदिवसा चोरी झाली.

या तीन घरातुन चोरट्यांली सोन्या चांदीच्या दागिन्यासह लाखो रूपये लुटले. काही महिन्याच्या फरकाने दिवसा झालेल्या या चोरीमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आतापर्यत चोऱ्या रात्री होतात हे ग्रामीण भागातील लोकांना माहिती होते; परंतु आता तर दिवसाच्या चोऱ्या होत असल्यामुळे घरातील मौल्यवान वस्तु ठेवायच्या कुठे असा प्रश्‍न लोकांना सतावत आहे.

एडगाव फौजदारवाडी येथील ज्या घरात चोरी झाली त्या घरातील महिलेले चोरीचा तपास होत नसल्यामुळे पोलीसांना अक्षरक्ष हैराण केले. दोन लाखाहुन अधिक किमतीचे मुद्देमाल चोरीस गेल्यामुळे ती महिला बैचेन आहे. अखेर तीने १५ ऑगस्टला उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. चोरीचा तपास होईल, असे आश्‍वस्त करून तिला थांबविण्यात आले.

तालुक्‍यात वाढत असलेल्या चोऱ्यां रोखण्यात पोलिसांना पुर्णपणे अपयश आले आहे. ग्रामीण भागातील घरे भरदिवसा फोडुन चोरी होत असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे. तालुक्‍यात बहुतांशी शेतकरी वर्ग आहे. शेतीच्या कामांकरीता कधी कधी दिवसदिवस त्यांना घराबाहेर राहावे लागते. त्यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भुईबावडा घाटात हवेत तपासणी नाके
आतापर्यंतच्या चोऱ्यांचा इतिहास पाहिला तर चोरटे चोरी करून कोल्हापूरच्या दिशेने गेल्याचे उघड झाल्याचे चोऱ्यांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाण्यासाठी दोन घाटमार्ग आहेत. त्यापैकी करूळ घाटात तपासणी नाका आहे; मात्र भुईबावडा घाटात तपासणी नाका नसल्यामुळे चोरट्यांकरिता हा मार्ग अतिशय सोयीचा ठरतो. त्यामुळे भुईबावडा घाटात देखील तपासणी नाके व्हायला हवेत.