यांत्रिकीकरण योजनेबाबत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य अंधारात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

सिंधुदुर्गनगरी -  राज्य अधिक्षक कृषी कार्यालयाच्या कृषी अवजारे यांत्रिकीकरण योजनेसाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवितांना अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी समितीला अंधारात ठेवल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. तब्बल दोन कोटी ४० लाखाचे प्रस्ताव या योजनेसाठी प्राप्त झाल्याची माहिती समोर येताच सभापतींसह सर्वच सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिक्षक शिवानी शेळके यांना धारेवर धरले.

सिंधुदुर्गनगरी -  राज्य अधिक्षक कृषी कार्यालयाच्या कृषी अवजारे यांत्रिकीकरण योजनेसाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागवितांना अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी समितीला अंधारात ठेवल्याची बाब आजच्या सभेत उघड झाली. तब्बल दोन कोटी ४० लाखाचे प्रस्ताव या योजनेसाठी प्राप्त झाल्याची माहिती समोर येताच सभापतींसह सर्वच सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिक्षक शिवानी शेळके यांना धारेवर धरले. आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांना लाभ देऊन योजनेचा निधी हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप समिती सदस्य अमरसेन सावंत यांनी कृषी समिती सभेत केला.

जिल्हा परिषद कृषी समिती सभा कृषी सभापती तथा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. या वेळी समिती सदस्य अमरसेन सावंत, महेंद्र चव्हाण, संजना सावंत, समिधा नाईक, अनुप्रिती खोचरे आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्य अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या कृषी अवजारे यांत्रिकीकरण योजनेसाठी शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्याले होते. यासाठी २ कोटी ४० लाख निधी खर्चाचे प्रस्ताव प्राप्त झाले असून प्रस्ताव करण्याची आज १० नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती, अशी माहिती अधिक्षक कृषी अधिकारी शिवानी शेळके यांनी कृषी समिती सभेत दिली. मात्र, या योजनेबाबत यापूर्वी कोणतीही माहिती सभेत देण्यात 
आली नव्हती. 

योजनेच्या माहितीपासून सभापतींसह सर्वच सदस्य अनभिज्ञ असल्याची बाब सभेत समोर आली. प्रस्ताव सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी मिळालेल्या माहितीमुळे सर्वच सदस्य आक्रमक झाले. राज्य अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जात नाही. समिती सभांना उपस्थित राहत नाहीत. 

सर्वच योजना आपल्या मर्जीतील ठराविक शेतकऱ्यांसाठी राबविल्या जात असल्याचा आरोप करत समिती सदस्य अमरसेन सावंत यांनी कृषी अधिक्षक शेळके यांना धारेवर धरले. जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी प्रस्ताव करण्याची मुदत आणखी १५ दिवस वाढविण्यात यावी अशी मागणी सर्वच सदस्यांनी केली. यावर शेळके आणि सदस्य यांच्यामध्ये शाब्दीक चकमक झाली. यावर कृषी अधिक्षक शेळके यांनी योजनांच्या माहितीसाठी वृत्तपत्रांचे वाचन करा असा सल्ला सदस्यांना दिला. 

जिल्ह्यात वणव्यामुळे (आगीमुळे) आंबा-काजू बागायतीच्या नुकसानीपोटी अर्थसहाय्य देण्याची योजना जिल्हा परिषदमार्फत राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वेळेत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सभापती देसाई यांनी सभेत केले. जिल्ह्यातील महिला बचतगटांसाठी कृषी अवजारे बॅंक योजना आणि नरेगा अंतर्गत बांधण्यात आलेल्या विहिरीवरुन सिंचन योजना राबविण्यासाठीचे साहित्य पुरविण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. या योजनांना सर्वसाधारण  सभेच्या मान्यतेने अंतिम अमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट केले.

वन्य प्राण्यांपासून जनावरांचे नुकसान आणि शेतीबागायतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्याची योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचा वेळेत पंचनामा करुन घेऊन परिपूर्ण प्रस्ताव वनविभागाकडे करावेत अशी माहिती सभेत देण्यात आली.

कृषी मेळावा डिसेंबरमध्ये...
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी डिसेंबरमध्ये सिंधु कृषी पशुपक्षी मेळावा आयोजन करण्याबाबतचे नियोजन जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. सलग तीन वर्षाच्या यशस्वी नियोजनानंतर या ४ थ्या वर्षी कृषी पशु-पक्षी मेळाव्याचे आयोजन केले आहे. याबाबतचे नियोजन सुरु असून डिसेंबरमध्ये या मध्यवर्ती ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत नियोजन सुरु आहे. २० नोव्हेंबरला होणाऱ्या जि. प.सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होवून अंतिम मंजुरी घेणार असल्याची माहिती उपाध्यक्ष देसाई यांनी दिली.