सिंधुदुर्गचे लवकरच स्वतंत्र गॅझेटियर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

काम युद्धपातळीवर : संचालक डॉ.बलसेकरांची माहिती; इतिहास परिषदेचा समारोप 

काम युद्धपातळीवर : संचालक डॉ.बलसेकरांची माहिती; इतिहास परिषदेचा समारोप 

वैभववाडी : तब्बल 140 वर्षांनतंर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेटियर बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता बनविण्यात येणारे गॅझेटियर दीड वर्ष असेल. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व माहिती समाविष्ट होण्यासाठी इतिहास परिषदेसह समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य शासनाचे पुराभिलेख विभागाचे संचालक डॉ. दीपक बलसेकर यांनी येथे केले. 
येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात कोकण इतिहास परिषदेच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचा समारोप आज सायंकाळी झाला. या कार्यक्रमाला भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, माजी आमदार प्रमोद जठार, अर्जुन रावराणे, विश्‍वनाथ रावराणे, प्रभानंद रावराणे, प्रमोद रावराणे, रवींद्र लाड, प्रकाश नारकर, सदाशिव टेटविलकर, प्राचार्य. सी. एस. काकडे आदी उपस्थित होते. डॉ. बलसेकर म्हणाले, ""अनेक वर्षांनंतर जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेटियर बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ते युद्धपातळीवर सुरू आहे. हे गॅझेटियर बनविताना कोणतीही चूक होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यातील भूगोल, इतिहास, कृषी, जलसिंचन, व्यापार-उदीम, दळणवळण, ऐतिहासिक गड-किल्ले, दुर्लक्षित स्थळे, सस्कृंती, परंपरा, जत्रौत्सव, कला, क्रीडा याशिवाय अगदी लहान लहान गोष्टींचा अभ्यास करून त्याचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी डोळसपणे आपल्याकडे असलेली माहिती जिल्हाधिकाऱ्यांपर्यत पोचविणे आवश्‍यक आहे. युवा पिढीलासुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. 
माधव भंडारी म्हणाले, ""कोकणला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे; परंतु काळाच्या ओघात अनेक गोष्टी दडपून गेल्या. आपल्याला माहीत नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांची नोंद इतिहासात नाही. सूर्यमंदिरे कोणत्या काळात उभारली गेली त्यांची माहिती आपल्याकडे नाही. ब्राह्मणमंदिरांचा पर्यावरण आणि पाणीव्यवस्थापनाशी काही संबंध आहे का हेसुद्धा इतिहासकार-संशोधकांनी तपासून पाहणे आवश्‍यक आहे. माझा कोकण किती समृद्ध आहे हे जगाला कळायला हवे. कोकणचे एकही प्रभाव क्षेत्र नाही. सामाजिक, सांस्कृतिक विविधतेने नटलेला हा प्रांत आहे. कोकणात जे जे दुर्लक्षित राहिले आहे ते शोधून काढून त्यांच्या नोंदी करणे आवश्‍यक आहे. हे काम इतिहास परिषदेने करावे,'' असे आवाहन त्यांनी या वेळी केले. कोकणातील वाड्यांची चर्चासुद्धा आता सुरू आहे. त्यांचे जतन आणि व्यावहारिकदृष्ट्या त्यांचा वापर होऊ लागला आहे. भविष्याला दिशा देतील असे दिशादर्शक ग्रंथ निर्माण व्हावेत असे आवाहन त्यांनी केले 
श्री. जठार म्हणाले, ""प्रत्येकांच्या आयुष्यातील हरविलेला क्षण म्हणजे इतिहासच असतो. इतिहास घडविणारे आणि बिघडविणारे दोन्ही घटक समाजात असतात. आपला जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे; परंतु परदेशी पर्यटक फक्त समुद्रकिनारा पाहायला येतात ही कल्पना चुकीची आहे. येथील इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला पर्यटक येतात. त्यामुळे आपल्या ऐतिहासिक ठेव्याचे पर्यटकीय नजरेतून मार्केटिंग व्हायला हवे. नवीन पिढीमध्ये प्रचंड कुतूहल आहे. ऐतिहासिक पर्यटनाची ओढ वाढेल यासाठी इतिहासप्रेमींनी प्रयत्न करावेत त्याला शासनाच्या वतीने सहकार्य मिळेल. 
 
जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी संग्रहालय 
सिंधुदुर्ग हा समृद्ध आहे. येथे फार विविधांगी मोठा खजिना आहे; परंतु एकाच ठिकाणी त्याचे जतन केले गेलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात संग्रहालय उभारण्यात यावे अशी मागणी कोकण इतिहास परिषदेने कार्यक्रमाप्रसंगी केली होती. तोच धागा पकडत जिल्ह्यात मध्यवर्ती एखादे संग्रहालय उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे अभिवचन कोकण परिषदेला दिले.