डोंगर, वनसंपत्तीची लूट 

डोंगर, वनसंपत्तीची लूट 

महाड - महाड तालुक्‍यांतील अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या गावांलगत प्रचंड प्रमाणामध्ये माती, दगडाचे उत्खनन सुरू आहे. महसूल विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने तालुक्‍यातील मातीमाफियांना रान मोकळे झाले आहे. येत्या काही वर्षांमध्ये तालुक्‍यातील डोंगर-दऱ्यांमध्ये शिल्लक राहिलेली वनस्पती, झाडे-झुडपे नष्ट होण्याची शक्‍यता आहे.

‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘जलयुक्त शिवार’ असे महत्त्वाकांक्षी उपक्रम सरकार राबवत असतानाच डोंगर उत्खनामुळे दरडग्रस्त असलेल्या या तालुक्‍याचे पर्यावरण धोक्‍यात आले आहे. ऐतिहासिक रायगड किल्ल्याप्रमाणे अनेक गड-किल्ले या परिसरात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडत आहेत. रायगडाच्या परिसरामध्ये असलेल्या पाचाड, कोंडरान, पायरीकोंड, या गावांलगत प्रचंड प्रमाणांमध्ये माती व दगडांचे बेकायदा उत्खनन केले जात आहे. महाड महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मात्र ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे. रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर नांदगावपासून चार किलो मीटरवर पायरीकोंड गाव आहे. अत्यंत दुर्गम परिसरांतील या गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत. गावापासून काही अंतरावर तालुक्‍यातील राजकीय पुढाऱ्यांनी बेकायदा मातीउत्खनन करून या परिसरांतील झाडांची बेसुमार कत्तल केलेली आहे. तेथे माती आणि दगडाचे उत्खनन करण्यासाठी अवजड यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. अवजड वाहतुकीमुळे रस्ते पूर्णपणे नादुरुस्त झाले आहेत. काळकाईकोंड, पायरीकोंड, खेडेकरवाडी, आयरेकोंड या गावांमध्ये जाण्यासाठी असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काळकाईकोंडपासून दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या वर्षी करण्यात आला; परंतु आज त्याचे अस्तित्वच राहिले नसल्याचे दिसत आहे. पायरीकोंड गावाजवळ असलेल्या दगडाच्या खाणी बेकायदा चालवल्या जात आहेत. हजारो ब्रास खनिज उत्खनन राजरोज होत असताना स्थानिक महसूल अधिकारी डोळ्यांवर झापडे लावून बसले आहेत काय, असा प्रश्‍न पडतो. सरकारचा महसूल तर बुडतच आहे; परंतु पर्यावरणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पर्यावरण रक्षणासाठी अनेक संस्था काम करतात; मात्र दगडमातीचे बेकायदा उत्खनन व झाडांची तोड ही पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाला मोठी बाधा आणत आहे. याकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे.

- नीलेश पवार, समाधान संस्था

ग्रामस्थांना शिक्षा 
 काळकाईकोंड, पायरीकोंड गावाकडे जाणाऱ्या सात किलो मीटर रस्त्याची अक्षरश: दुरवस्था झाली आहे. याला एकमेव कारण या परिसरामध्ये असलेल्या बेकायदा दगडखाणी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
 मातीचे उत्खनन प्रचंड प्रमाणामध्ये होत असल्याने पावसाळ्यात डोंगरातून मातीच्या दरडी रस्त्यावर कोसळून वाहतूक बंद होते. चार-चार दिवस या परिसराचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
 दळणवळणाची प्रमुख समस्या कायम असल्याने गाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे.
 पाचाड, पायरीकोंड, काळकाईकोंड, खेडेकरवाडी या गावांच्या परिसरामध्ये बेकायदा दगड, माती उत्खनन करणाऱ्यांवर त्वरित कारवाईची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com