एसटी अपघातातील जखमींना अद्याप मदत नाही

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

राजापूर : गत आठवड्यामध्ये हातिवले येथे झालेल्या दोन एसटी अपघातांमधील जखमी विद्यार्थ्यांसह अन्य काही प्रवाशांना उपचारांसाठी अद्यापही एसटी विभागाने आर्थिक मदत दिलेली नाही. आर्थिक पाठबळाअभावी जखमींचे पुढील उपचारही रखडले आहेत. प्रवाशांना एसटी विभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

राजापूर आगारप्रमुख अभिजित थोरात यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. गत आठवड्यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर आगाराच्या दोन एसटी गाड्यांची समोरासमोर धडक झाली होती. यामध्ये यशोदा खांबल या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता, दोन्ही एसटीतील सुमारे 78 प्रवासी जखमी झाले होते. त्यामध्ये तेरा गंभीर जखमी होते. प्रवाशांना उपचारासाठी तातडीची मदत एसटी. विभागाकडून देण्यात आली. त्याचा तालुक्‍यातील 43 जणांना लाभ मिळाला. अद्यापही काहींना मदत मिळालेली नाही. यासंदर्भात आगारप्रमुख थोरात यांची आज भेट घेतल्याचे श्री. यशवंतराव यांनी सांगितले. एसटी अपघातामधील चार विद्यार्थी गंभीर जखमी असून आर्थिक पाठबळाअभावी त्यांना पुढील उपचार घेता येत नाहीत. त्यामुळे अशा जखमी विद्यार्थ्यांना एसटी विभागाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आगारप्रमुख श्री. थोरात यांच्यासह विभागीय वाहतूक नियंत्रक रसाळ यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आत्माराम सुतार, कृष्णा म्हादये, संजय ओगले, मनोहर गुरव, हुंदळकेर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.