राष्ट्रीय समाज पक्ष बळकट करा - जानकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

चिपळूण - राज्यातील उर्वरित भागात राष्ट्रीय समाज पक्षाची मजबूत ताकद असली, तरी कोकणात पक्षाचे मजबूत संघटन नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचवाव्यात. पक्ष संघटनेस प्राधान्य देऊन पक्षाला अधिक बळकटी द्यावी, अशी सूचना पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.

चिपळूण - राज्यातील उर्वरित भागात राष्ट्रीय समाज पक्षाची मजबूत ताकद असली, तरी कोकणात पक्षाचे मजबूत संघटन नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी विविध शासकीय योजना तळागाळापर्यंत पोचवाव्यात. पक्ष संघटनेस प्राधान्य देऊन पक्षाला अधिक बळकटी द्यावी, अशी सूचना पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली.

श्री. जानकर यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन केले. दौऱ्याच्या निमित्ताने चिपळुणातील शासकीय विश्रामगृहात मंत्री जानकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जानकर यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात हजेरी लावल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष विस्तारासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या. तसेच पक्षाकडून कार्यकर्त्यांनी सुचवलेल्या विकासकामांना निधी देण्याची मागणी केली. यावर जानकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात पशुसंवर्धन, दुग्धविकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जाईल. कार्यकर्त्यांनी धनगरवाड्यामध्ये सुचवलेली कामे मंजूर केली आहेत. जिल्ह्यातील शेळीपालन, दुग्ध व्यवसाय करणाऱ्या तरुणांना निधी दिला जाईल. विविध शासकीय योजना तळागाळात पोचवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली पाहिजे. ग्रामीण भागात कार्यकर्ते पोचले तरच पक्षाशी ग्रामस्थांची नाळ जुळणार आहे.’’ 

कोकणात पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांच्या मागे ताकद उभी करणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले. या वेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते श्‍याम गवळी, जिल्हाध्यक्ष अशोक पवार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज नरवणकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दीप्ती कदम, चिपळूण तालुकाध्यक्ष राजाराम पालांडे, खेड तालुकाध्यक्ष मंगेश झोरे, उपाध्यक्ष संतोष खरात, मंडणगड युवा तालुकाध्यक्ष प्रकाश खरात, लोटे एमआयडीसी शाखाध्यक्ष राहुल झोरे, मोहसिन मुकामदार, पंधरागाव शाखाध्यक्ष सुरेश जानकर, धनंजय जाधव, तसेच विष्णू धोंडमरे उपस्थित होते.

कृषी विद्यापीठाला भेट

दाभोळ - राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यात दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाला भेट दिली. या वेळी त्यांनी विद्यापीठाच्या कामकाजाची माहिती घेऊन विद्यापीठातील शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याबद्दल समाधान व्यक्‍त केले.

विद्यापीठाने संशोधन केलेली शेळीची कोकण कन्याळ ही जात कोकणातील शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी अत्यंत उपयुक्‍त व वरदान ठरणारी आहे. परंतु, विद्यापीठास शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास अडचणी आहेत. यासाठी शासनाकडून विद्यापीठास या प्रकल्पासाठी अनुदान देण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर विद्यापीठाने शेतकऱ्यांना २० शेळ्या व १ नर याप्रमाणे मागेल त्या शेतकऱ्यांना या जातीच्या शेळ्यांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. कोकणात पर्जन्यवृष्टी जास्त असल्याने उर्वरित महाराष्ट्रातील निकष कोकणातील शेतकऱ्यांना लागू करण्यात अडचणी आहेत. 

याकरिता खास बाब म्हणून कोकणातील शेतकऱ्यांना शेततळे अस्तरित करण्यासाठी शासनाकडून जादा अनुदान उपलब्ध करण्याकरिता योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी आश्‍वासन दिले. विद्यापीठाच्या दालनात या बैठकीकरिता केंद्रीय डीएनटी आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते, भाजपचे तालुकाध्यक्ष श्रीराम (भाऊ) इदाते, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. उत्तम महाडकर, तसेच सर्व विभागप्रमुख व शास्त्रज्ञ उपस्थित होते.