वर्षभरात कोटीपेक्षा जास्त कुटुंबांची गरिबी दूर होईल : सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

पूर्वी राणेंचे सरकार होते. त्या वेळी सहा ते आठ तास भारनियमन असायचे. आता जिल्हा भारनियमन मुक्त आहे. मुख्यमंत्र्यांकडून खूप चांगले काम सुरू आहे. शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले जायचे; पण कॉंग्रेसने त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. आमच्या सरकारने यात सुधारण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. कॉंग्रेस सरकारच्या काळात 5 हजार कोटींचे पॅकेज जाहीर झाले; पण ते आलेच नाहीत. आम्ही सांगतो ते करून दाखवितो. येथे रोजगारनिर्मितीसाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. याला बळकटी देण्यासाठी भाजपला संधी द्यावी. 
- रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री

कुडाळ : 'केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार असल्यामुळे विविध विकासकामे वेगाने होत आहेत. येत्या वर्षभरात 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांची गरिबी दूर होणार आहे. त्यामुळे त्याच विचाराचे सरकार जिल्हा परिषदेत आणल्यास विकास अधिक गतीने होईल,' असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे काल झालेल्या विजय संकल्प सभेत केले.

येथील एसटी डेपो मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत ते बोलत होते. श्री. प्रभू म्हणाले, ''मुख्यमंत्री राज्यभर दौरा करत आहेत. त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल होण्यासाठी काम करायचा धडाका लावला आहे. आपला जिल्हा साक्षर आणि स्वच्छ म्हणून देशस्तरावर गौरविला गेला. याचे श्रेय सिंधुदुर्गवासीयांना जाते. कारण त्यांच्या कर्तृत्वामुळेच हे यश मिळाले. या निवडणुकीतही मतदानातून जिल्हावासीयांनी साक्षरता आणि स्वच्छतेचा प्रत्यय द्यावा. जिल्हा प्रशासनाची स्वच्छता करून भाजपला मतदान करावे. यातून साक्षरतेचा प्रत्यय येईल. केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्याने अनेक योजना, विकासकामे करणे शक्‍य झाले. त्याच विचाराचे सरकार जिल्हास्तरावर आले, तर सिंधुदुर्ग आर्थिकदृष्ट्या देशभरात अग्रगण्य ठरेल.'' 

पूर्वी निवडणुकीपुरते आणि स्वतःची घरे भरण्यासाठी राजकारण केले जायचे. मोदींचे राजकारण सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आहे. असे ध्येय ठेवणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. यामुळे परिवर्तन सुरू झाले आहे. खऱ्या गरिबांसाठी योजना आखल्या आहेत. पुढच्या वर्षभरात 1 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांची गरिबी दूर होईल. 

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी सगळ्यात आधी चुकीची धोरणे बंद करायला सुरवात केली. पूर्वी घर बांधण्यासाठी एनएची गरज भासायची. याचे सोपस्कार पूर्ण करताना गरिबांना नाकीनऊ यायचे. त्यांनी ही पद्धत बंद केली. फडणवीस सरकारनेही कामाचा धडाका लावला आहे. मोदी देश बदलत आहेत, तर फडणवीस हे राज्याला पडलेले सुस्वप्न आहे. या विकास प्रवाहात सामील होण्यासाठी जिल्ह्यातही भाजपचे सरकार आवश्‍यक आहे. एकाच विचाराचे सरकार असेल तर विकास अधिक वेगाने होईल. 
सावंतवाडीत टर्मिनस होऊ शकत नाही, असे याआधीचे रेल्वेमंत्री लेखी देत होते. आम्ही टर्मिनसचे काम पूर्ण केले. मागण्या पूर्ण होत नसल्याने लोकांनी रेल्वेविषयी बोलणेच सोडले होते; पण आम्ही लोकांच्या अपेक्षेच्याही पलीकडची कामे सुरू केली. केंद्र आणि राज्य यांची जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापन करून यातून अनेक विकासकामे प्रस्तावित केली आहेत. येथे रोजगारनिर्मितीसाठी ई कॅटरिंगसारखे प्रकल्प राबवत आहोत.'' 

या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ''अनेक वर्षे भूलथापा देऊन काही पक्षांनी सत्ता मिळविली. आमच्या पक्षाने दोन वर्षांत केवळ विकासकामे केली. हीच कामे जिल्हावासीयांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुद्रा योजना, विमा योजना यातून अनेकजण याचा फायदा घेत आहेत.'' 

या वेळी काका कुडाळकर, स्नेहा कुबल, संदेश पारकर आदींनी मार्गदर्शन केले. अतुल काळसेकर यांनी सूत्रसंचालन केले. भाजपच्या वचननाम्याचे प्रकाशनही करण्यात आले. 

विरोधकांना मोदी बिंदू 
या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले, ''कॉंग्रेसला मोदी बिंदू झाला आहे. त्यांना भाजपने केलेली विकासकामे दिसत नाहीत. भाजपने जिल्ह्यात मंत्रिमंडळ बैठक घेऊन 1 हजार कोटींचे विकास पॅकेज द्यावे. प्रभूंनी रेल्वे दुपदरीकरण काम मार्गी लावले आहे. त्यांनी समुद्रमार्गेही रेल्वेट्रॅक उभारावा अशी आमची मागणी आहे.''