निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

कणकवली - सिंधुदुर्गातील काही ठेकेदार रस्त्यांची कामे निकृष्ट करीत आहेत. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, तसेच काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी बांधकाम खात्याची तज्ज्ञ मंडळी असावीत, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी आज केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. बासुदकर यांना दिले.

कणकवली - सिंधुदुर्गातील काही ठेकेदार रस्त्यांची कामे निकृष्ट करीत आहेत. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, तसेच काम सुरू असलेल्या प्रत्येक ठिकाणी बांधकाम खात्याची तज्ज्ञ मंडळी असावीत, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी आज केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. बासुदकर यांना दिले.

भाजपचे नगरपंचायत सेल अध्यक्ष शिशिर परुळेकर, महिला तालुकाध्यक्षा गीतांजली कामत, युवा मोर्चा उपाध्यक्ष पप्पू पुजारे, दीपक दळवी, समर्थ राणे, प्रितम मोर्ये, प्रवीण पाटील आदींनी उपकार्यकारी अभियंता श्री. बासुदकर यांची भेट घेऊन निकृष्ट कामांबाबत जाब विचारला. तालुक्‍यात सातत्याने निकृष्ट कामे होतात. गतवर्षी झालेल्या डांबरीकरणानंतर पुन्हा त्याच रस्त्यावर खड्डे पडतात. यात जनतेचा पैसा वाया जातो. असे प्रकार रोखण्यासाठी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, अशी आग्रही मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. कणकवली तालुक्‍यात गेल्या वर्षी कणकवली-नागवे या रस्त्याचे काम निकृष्ट झाले होते. ग्रामस्थांनी चार वेळी हे काम बंद पाडले होते. याखेरीज कुंभवडे, बिडवाडी, नागवे, हळवल, शिडवणे येथील रस्त्यांचीही कामे निकृष्ट झाली होती. ही सर्व कामे नागरिकांनी पुढे येऊन बंद पाडली. त्यानंतर त्या ठेकेदाराला या कामांमधील दर्जा चांगला ठेवावा लागला. आठ दिवसापूर्वी कणकवली-साकेडी या रस्त्याच्या कामातही निकृष्ट दर्जा ठेवला होता.

साकेडीतील ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर, निकृष्ट काम काढून टाकून तेथे पुन्हा नव्याने डांबरीकरण केले. तालुक्‍यात अशी वारंवार आंदोलने होऊ नयेत यासाठी बांधकामच्या अधिकाऱ्यांनीच कामावर आणि गुणवत्तेवर नियंत्रण ठेवायला हवे, अशी मागणी श्री. परुळेकर यांनी केली.

नागरिकांना मनस्ताप कशासाठी?
रस्ता काम करणारे ठेकेदार डांबरीकरणासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात. रस्ता कामाची कुठलीच माहिती नसणारी ठेकेदाराची मंडळी किती डांबर वापरावे, किती खडी वापरावी हे ठरवत असतात. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर ही कामे बंद पाडली जातात. प्रत्येक वेळी नागरिकांनी कामाचा दर्जा लक्षात आणून दिल्यानंतर बांधकामचे अधिकारी तेथे धाव घेतात. सर्व नागरिकांना असा मनस्ताप देण्यापेक्षा बांधकामच्या अधिकाऱ्यांनीच कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, अशीही मागणी यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली.

Web Title: Take action on those bad things