दूध डेअरीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न - महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

कणकवली - शहरालगतच्या वागदे येथील दूध डेअरीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी तांत्रिक कर्मचारी आणि आधुनिक यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसा प्रस्ताव दुग्धविकास विभागाने सादर करावा, असे निर्देश राज्याचे मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आज येथे दिले.

मच्छी मार्केटमध्ये चिकन, मटन विक्रेत्यांना व्यवसाय करण्याबाबत लवकरच नवीन धोरण ठरविले जाणार आहे. हे धोरण राज्यासाठी लागू असेल असेही ते म्हणाले.

कणकवली - शहरालगतच्या वागदे येथील दूध डेअरीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी तांत्रिक कर्मचारी आणि आधुनिक यंत्रसामग्री दिली जाणार आहे. तसा प्रस्ताव दुग्धविकास विभागाने सादर करावा, असे निर्देश राज्याचे मत्स्योद्योग, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आज येथे दिले.

मच्छी मार्केटमध्ये चिकन, मटन विक्रेत्यांना व्यवसाय करण्याबाबत लवकरच नवीन धोरण ठरविले जाणार आहे. हे धोरण राज्यासाठी लागू असेल असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले राज्याचे मत्स्योद्योग, दुग्धविकास आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी आज सकाळी शासकीय दूध डेअरीची पाहणी केली. यानंतर त्यांनी कणकवली नगरपंचायतीच्या मच्छीमार्केटची पाहणी केली. त्यांच्यासोबत कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, प्रसाद अंधारी, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह मटन, चिकन आणि मत्स्य विक्रेते उपस्थित होते.

श्री. जानकर यांनी शासकीय दूध डेअरीला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील यंत्रसामग्री, दूध संकलनाची स्थिती याबाबतचा आढावा घेतला. सध्या बंद अवस्थेत असलेल्या या डेअरीच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव तातडीने सादर करा. नवीन यंत्रसामग्री, अद्ययावत इमारत याबाबतचाही विस्तृत आराखडा सादर करा असे निर्देश श्री.जानकर यांनी दुग्धविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कणकवली नगरपंचायतीने मच्छी आणि चिकन-मटण मार्केटची उभारणी केली. परंतु या इमारतीसाठी मत्स्य विभागाचा निधी वापरल्याने येथे चिकन आणि मटण विक्रेत्यांना व्यवसाय करता येत नाही, याबाबतच पर्याय काढला जावा अशी मागणी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, संदेश पारकर आदींनी श्री.जानकर यांच्याकडे केली. यावेळी श्री.जानकर यांनी वस्तुस्थिती पाहण्यासाठी मच्छी मार्केटला भेट दिली.

त्यावेळी त्यांनी मत्स्यआयुक्‍त श्री. बोडके यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. तसेच मच्छी मार्केटमध्ये चिकन आणि मटण विक्रेत्यांनाही व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याबाबत नवीन धोरण लवकरच निश्‍चित करणार असल्याची ग्वाही दिली. दरम्यान शहरात मच्छी, मटण व चिकन विक्रेते एकाच ठिकाणी आल्यास शहरातील दुर्गंधीचे प्रमाण कमी करता येईल व नागरिकांनाही एकाच जागी चांगली सुविधा पुरविता येईल याकडे संदेश पारकर यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच ज्या वेळी मच्छी विक्रेत्यांची संख्येत वाढ होईल तेव्हा मटण - चिकन विक्रेत्यांना सदर कट्टे व गाळे खाली करून देण्याबाबत करार करून देण्यात येईल, अशीही माहिती दिली. यावेळी श्री.जानकर यांनी कणकवलीसाठी विशेष बाब म्हणून लवकरच मच्छी मार्केटमध्ये चिकन व मटण विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठीची अधिसूचना काढली जाईल, असे आश्‍वासन दिले.
 

डेअरीचे खासगीकरण नाही
कणकवली दूध डेअरीमध्ये खासगी कंपन्यांचे दूध संकलन, शीतकरण केले जात होते. मात्र या शासकीय डेअरीचे खासगीकरण होणार नाही. इथला शेतकरी सक्षम व्हायचा असेल तर अद्ययावत डेअरी असायलाच हवी. त्यादृष्टीने आम्ही कार्यवाही करत असल्याची ग्वाही श्री. जानकर यांनी दिली.

Web Title: trying for milk dairy revival