शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही; तरीही जोपासला अनोखा छंद!

संदेश सप्रे - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

देवरूख - ग्रामीण भागात शेती आणि पशुपालनाचा जोडधंदा करताना अनेक जण वेगवेगळे छंद जोपासतात. विशेष म्हणजे कोणतेही प्रशिक्षण न घेता ग्रामीण भागातील अनेकांचे छंद तोंडात बोटे घालायला लावतात. संगमेश्‍वर तालुक्‍यातील चिखली गावातील तुकाराम पंडव यांनाही पशुपालन करतानाच गवतापासून विविध वस्तू बनविण्याचा छंद लागला. आज वयाच्या ६५ व्या वर्षीही त्यांनी हा छंद जोपासला असून त्यांच्या हस्तकलेतून निर्माण झालेल्या अनेक वस्तू पाहताना भारावून जायला होते. 

ग्रामीण भागात सर्रास शेतीसाठी पशुपालन केले जाते; मात्र शेतीची कामे हंगामी होतात ती कामे सोडल्यास पशुंसाठी वेगळा वेळ द्यावा लागतो. गुरे चरायला सोडली, की बसल्या जागी काहीतरी करायचे, या हेतूने अनेक जण छंद जोपासतात. चिखली गावातील तुकाराम पंडव यांचाही शेती हाच व्यवसाय. याच जोडीला ते पशुपालन करतात. शेती झाली की गुरांना चरायला सोडल्यावर बसल्या जागी करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्या मनात आला. समोरच असलेल्या गवतापासून काहीतरी बनवावे या हेतूने त्यांनी सुरवातीला एक फुलदाणी बनविण्याचा प्रयत्न केला. कोकणात सर्रास माळरानावर बार्डी प्रकारचे गवत उगवते. हे गवत सुकल्यावरही तुटत नाही. याच गवताचा वापर करून त्यांनी मोठ्या मेहनतीने एक फुलदाणी साकारली. आपले कौशल्य यशस्वी झाल्याचे पाहून त्यांनी उन्हात वापरायला होईल अशी गवती टोपी साकारली. टोपीचा प्रयत्नही यशस्वी झाल्यावर त्यांनी विविध आकाराच्या टोप्या बनवल्या आहेत. केवळ गवती कामावरच न थांबता त्यांनी चिव्याच्या कामठ्यांपासून अनेक वस्तूही साकारल्या आहेत. आज वयाच्या ६५ व्या वर्षीही ते उत्साहाने या वस्तू लीलया साकारतात. गवतात सापडणाऱ्या तांबेटी या प्रकाराचा वापर फार पूर्वी चित्रकलेसाठी केला जात होता. याचे गवत मध्यभागी पोकळ असल्याने त्याला ब्रशसारखा आकार देऊन याचा उपयोग होत असे, आता मात्र रेडीमेड ब्रश मिळत असल्याने हे गवतही दुर्लक्षित झाले आहे. याचाही उपयोग करून तुकाराम पंडव विविध वस्तू साकारतात.

Web Title: Tukaram pandav