आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीला मज्जाव - शेंड्ये

आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीला मज्जाव - शेंड्ये

रत्नागिरी - रत्नागिरी स्थानकात दादर पॅसेंजरमधील जागेवरून पुन्हा मंगळवारसारखा (ता. १८) गोंधळ उडू नये, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. रत्नागिरीच्या दोन आणि संगमेश्‍वर, चिपळूण, खेडच्या प्रत्येकी एक अशा पाच बोगीत प्रवासी घुसणार नाहीत, यासाठी रेल्वे पोलिस नियुक्‍त केले जातील. मात्र, मडगावहून आलेल्या प्रवाशांना बाहेर काढता येणार नाही. ती गाडी दोन टप्प्यांत चालविली असली तरीही मडगाव-रत्नागिरी-दादर अशीच आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंड्ये यांनी दिली.

या वर्षी गणेशोत्सवात २०२ जादा फेऱ्या चालविल्या असून आतापर्यंत सुमारे आठ लाखांपेक्षा अधिक चाकरमान्यांनी लाभ घेतल्याचेही श्री. शेंड्ये यांनी सांगितले. दादर पॅसेंजरमध्ये झालेल्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर आज रेल्वे प्रशासनातर्फे अधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी बी. एस. नडगे, श्री. मंजुनाथ आणि एस. डी. आंबर्डेकर उपस्थित होते.

श्री. शेंड्ये म्हणाले, ‘कोकण रेल्वे मार्गावर मडगावपर्यंत एखादी गाडी असावी, अशी मागणी होती. त्यातच व्यवस्थापकीय तांत्रिक अडचणींमुळे अखेर दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुढे मडगावपर्यंत नेण्यात येते. दिवाळी, गणपती, शिमगोत्सवातच गाडीला गर्दी असते. उर्वरित दिवसांमध्ये गाडीत ५० ते ६० प्रवासीच असतात.

रत्नागिरीतील प्रवाशांसाठी आरक्षित दोन डबे राखीव आहेत. गणेशोत्सवात प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेने स्टेशनवरील तिकीट काऊंटरबरोबरच पोस्ट कार्यालय, टाऊन बुकिंग काऊंटर सुविधा दिली. त्याचा फायदा झाला. आरोग्य सुविधा देण्यासाठी सहा ते सात ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली. त्याचा लाभही प्रवाशांना झाला.

पॅसेंजरचे डबे वाढविण्यात अडचणी  
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ४६ गाड्या कमी सोडण्यात आल्या. त्याऐवजी काही गाड्यांना जादा डबे जोडण्यात आले. पॅसेंजरचे डबे वाढविणे सध्या शक्‍य नाही. दादर स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांना जादा डबे जोडण्यात तेथील कमी लांबीच्या फलाटामुळे अडचणी आहेत, असे श्री. शेंड्ये यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com