शिवसेनेचे मिशन कणकवली

शिवसेनेचे मिशन कणकवली

वैभववाडी - जिल्ह्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघ काबीज केल्यानंतर शिवसेनेने आता मिशन कणकवलीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि भाजपचा प्रभाव असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात गेल्या काही महिन्यापासुन शिवसेना सक्रिय झाली आहे. विविध पक्षातील असंतुष्ट पदाधिकारी आणि शिवसेनेप्रती ओढ असलेल्या मतदारांचा शोध कार्यकर्त्यानी सुरू केला आहे. याशिवाय संघटनात्मक कामात देखील आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या मतदारसंघातून जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे निवडणूक लढविणार असल्याची कार्यकर्त्यामध्ये चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढविल्या जातील हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये वरिष्ठ पातळीवर प्रचंड वितुष्ट निर्माण झाले आहे. एकमेकांविरुद्ध टीकेचे आसुड नेहमीच ओढले जात आहेत. त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची निवडणूकपूर्व युती होणे अशक्‍य प्राय मानले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातून तगडे उमेदवार निवडणुकीत उतरविण्याची शिवसेनेची रणनीती आहे. सावंतवाडी आणि कुडाळ-मालवण या दोन्ही मतदारसंघावर सध्या शिवसेनेचा प्रभाव आहे. येथील दोन्ही आमदार हे शिवसेनेचे आहेत; परंतु कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना प्रतिस्पर्धी पक्ष काँग्रेस आणि भाजपाच्या तुलनेत खुपच दुबळी आहे. म्हणुनच या मतदारसंघावर शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या सहा-सात महिन्यापासून शिवसेना या मतदारसंघात सक्रिय झाली आहे. संघटनात्मक पदे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना क्रियाशील करण्यात आले आहे.

त्यांच्यातील मरगळ झटकून यापुढे या मतदारसंघात शिवसेना नव्याने ताकद उभी करणार असे अभिवचन वरिष्ठांनी या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे त्या त्या तालुक्‍यातील स्थानिक कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागले आहेत. हा मतदारसंघ युतीच्या वाटपात भाजपकडे जात असल्यामुळे शिवसेनेचे वरिष्ठ या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करीत होते; परंतु हे चित्र आता बदलल्याचे दिसत आहे.

या मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख दुधवडकर हे निवडणूक लढवतील अशी शक्‍यता कार्यकर्ते वर्तवित आहेत.त्यांनी गेल्या काही महिन्यांपासुन मतदारसंघातील संपर्क वाढला आहे. 

एवढेच नव्हे तर यावर्षी त्यांनी या मतदारसंघात दीड लाख वह्यावाटप केले. या वह्यावाटपाचे वितरण कधी नव्हे इतके नियोजनबध्द पध्दतीने करण्यात आले. 

गावागावातील कार्यकर्त्यांना या वितरणात सामील करून घेण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षापासुन शिवसेनेचे पाईक असलेले; परंतु राजकीय प्रवाहपासुन दुर झालेले कार्यकर्ते पुन्हा शिवसेनेशी जोडले गेले आहेत.
जिल्हा संपर्कप्रमुख पद असलेले श्री. दुधवडकर यांचा संघटनात्मक बांधणीत हातखंडा आहे. निवडणुकीला अजुन दोन वर्षाचा कालावधी आहे; परंतु श्री. दुधवडकर यांनी आतापासुनच मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. विविध पक्षाच्या राजकीय हालचालीवर त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगितल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षातील प्रभावी; परंतु असंतुष्ट पदाधिकारी गळाला लागतात याची चाचपणी सुध्दा सुरू आहे. स्थानिक पदाधिकारी त्यादृष्टीने तयारीला लागले आहे.

आतापर्यत कणकवली विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि भाजपाचा प्रभाव होता. पुर्नरचनेत हा मतदारसंघ तयार झाल्यानंतर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रमोद जठार यांनी काँग्रेस रवींद्र फाटक यांचा अवघ्या ३४ मतांनी पराभव केला होता. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नितेश राणे यांनी भाजपाचे प्रमोद जठार यांचा २५ हजार मताधिक्‍यांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेला अतिशय लाजिरवाणी मते मिळाली. त्यामुळे शिवसेना निवडणुकीला दोन वर्ष शिल्लक असताना निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे या मतदारसंघात यापुढील काळात काँग्रेस,भाजप आणि शिवसेनेतील स्पर्धा अधिक त्रीव  झालेली दिसुन येईल.

प्रतीक्षा राजकीय उलथापालथीची
कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पाळेमुळे रोवू लागली आहे; परंतु शिवसेनेला चर्चेतल्या राजकीय उलथापालथीची प्रतीक्षा आहे. गेल्या काही महिन्यापासून काँग्रेस नेते नारायण राणे हे भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा आहे. आता तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानतंर श्री. राणे हे प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. श्री. राणेंनी भाजपात प्रवेश केला तर श्री. राणेंशी काडीमोड घेऊन भाजपात प्रवेश केलेले पदाधिकारी सेनेच्या गोटात सामील होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय भाजपातील नाराज देखील शिवसेनेला साथ देतील, अशी शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com