भाजीमार्केटला हिरवा कंदील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

सावंतवाडी - पालिकेतर्फे पाच कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या नव्या मार्केटसाठी आवश्‍यक असलेली मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आता तीन ते चार महिन्यांत मार्केटचे काम सुरू होण्याची शक्‍यता आहे. याला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दुजोरा दिला आहे. आज याबाबत कोकण भवनमध्ये अधिकाऱ्यांची बैठकही झाली. त्यात या कामाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांचे सहकार्य घेऊन लवकरात लवकर काम सुरू करण्याचा मानस आहे, असे त्यांनी सांगितले. 

पालिकेने शहरात आधुनिक मच्छीमार्केट उभारण्यात आले. पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर उद्‌घाटन केलेले हे मार्केट मॉलसारखे आहे, असे सांगून तो एक प्रचाराचा मुद्दा सत्ताधाऱ्यांकडून बनविण्यात आला होता. तत्कालीन परिस्थितीत आचारसंहिता लागल्यामुळे संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी उभारण्यात आलेले मार्केट तांत्रिक बाबीत अडकले होते. ते आता मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज मुंबई कोकण भवनमध्ये बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा करण्यात झाली. या बैठकीला पालिकेचे बांधकाम विभागाचे अभियंता तानाजी पालव आणि अन्य अधिकारी उपस्थित राहिले. याबाबतची माहिती नगराध्यक्ष साळगावकर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘लोकांची सोय होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे मार्केट लवकरात लवकर उभे राहणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेला पाठपुरावा शासनस्तरावर सुरू आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष लक्ष घातले आहे. यापूर्वीच पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता दूर करण्यास यश आले. त्यामुळे येत्या काही महिन्यात प्रकल्पाचे काम सुरू करण्याच्या अपेक्षा आहेत. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे.’’

व्यापाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय.
मार्केटचे बांधकाम करताना सद्यस्थिती, त्या ठिकाणी असलेल्या व्यापारी तसेच अन्य छोटे मोठे व्यावसायिक यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याची गरज आहे; मात्र पुनर्वसन कोठे करावे याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, या प्रक्रियेत नागरिकांना सुद्धा समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.