वेंगुर्लेत पुष्प प्रदर्शन ठरले लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

वेंगुर्ले - येथील फळ संशोधन केंद्र आयोजित पुष्प प्रदर्शन जिल्ह्याच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे. यातून शास्त्रीजींच्या स्वप्नातील ‘जय जवान, जय किसान’ असा भारत घडेल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी येथे गुरुवारी (ता. २६) व्यक्त केली.

वेंगुर्ले - येथील फळ संशोधन केंद्र आयोजित पुष्प प्रदर्शन जिल्ह्याच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे. यातून शास्त्रीजींच्या स्वप्नातील ‘जय जवान, जय किसान’ असा भारत घडेल, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी येथे गुरुवारी (ता. २६) व्यक्त केली.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आंबा, काजू शेतीबरोबरच फुलशेतीकडे प्रवृत्त व्हावे या मुख्य उद्देशाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर यांच्या संकल्पनेतून व लोकसहभागातून प्रादेशिक फळ संशोधन केंद्र येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुष्प प्रदर्शन आयोजित केले होते. हे प्रदर्शन लक्षवेधी ठरले. या वेळी प्रभूगावकर यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. 

ते म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना उमेद मिळते. शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्याने वाटचाल केल्यास त्याचा आर्थिक स्तर उंचावेल व पर्यायाने जिल्ह्याचे भवितव्य बदलण्यासही मदत होईल. पुढील काळात अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाचे जिल्ह्यात आयोजन करण्यात येईल, ज्यातून मुंबई व इतर भागातून येणाऱ्या पर्यटकांना आपल्या जमिनीत काय व कशाप्रकारे पिकते याची माहिती करून देण्याचा उद्देश असेल.’’

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन देवदत्त परुळेकर, पाटकर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी यूथ संस्थेचे श्रीनिवास गावडे, डॉ. प्रदीप हळदवणेकर, डॉ. बी. एन. सावंत आदी उपस्थित होते. या पुष्प प्रदर्शनात गुलाब, जर्बेरा, शेवंती, कार्नेशन, अँथोरियम, ऑर्किड, लिलिअम या फुलांच्या विविध प्रकारच्या सुमारे १०२ जातींचे तसेच त्या फुलांच्या सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या शोभिवंत पाने (फिलर मटेरियल) यांचेही प्रदर्शन करण्यात आले होते. 

हळदवणेकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील शेतकरी मुख्यत्वे करून आंबा, काजू इत्यादी पारंपरिक पिकाची लागवड करतात. परंतु फुल शेती हे क्षेत्र पूर्णतः दुर्लक्षित आहे. स्थानिक बाजारपेठांचा विचार केल्यास १०० टक्के फुले कोल्हापूर, पुणे, बेंगलोर आदी मोठ्या शहरातून येतात. या प्रदर्शनात प्रदर्शित केलेल्या विविध जातींच्या फुलांबरोबरच इतर सुशोभीकरणासाठी लागणारे फिलर मटेरियलचे या जिल्ह्यात चांगल्या तऱ्हेने उत्पादन होऊ शकते. यासाठी छोट्या शेतकऱ्यांना या फिलर मटेरियल उत्पादनापासूनसुद्धा चांगले आर्थिक सहकार्य मिळू शकते.’’

या ठिकाणी पुष्परचना स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण २२ स्थानिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. याचा निकाल अनुक्रमे असा - सौ. वंदना चव्हाण (कुडाळ), युवराज्ञी पाटील (वेंगुर्ले), शीतल तिवरेकर व संदीप परब विभागून. प्रदर्शन पाहण्यासाठी बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. पुष्परचनेतील विजेत्यांना डॉ. हळदवणेकर यांच्या हस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले.
 

पुष्पवैभव...
या प्रदर्शनात विविध प्रकारच्या फुलांची आकर्षक स्वरुपात मांडणी करण्यात आली होती. यामध्ये मुख्यत्वे गुलाबाचे १२ प्रकार, निर्यातक्षम जरबेराचे ५० प्रकार, एकेरी व दुहेरी रंगाच्या शेवंतीचे २० प्रकार, कार्नेशनचे १५ प्रकार तसेच इतर शोभिवंत फुलांचा समावेश होता.

Web Title: vengurle flower exhibition