वेंगुर्ले सभापतिपदी परब

वेंगुर्ले सभापतिपदी परब

वेंगुर्ले - येथील पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण असल्याने खुल्या प्रवर्गातील व शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य यशवंत सुभाष परब यांची निवड होणार आहे. श्री. परब हे तुळस पंचायत समिती मतदारसंघातून विजयी झालेले होते. सभापतिपदासाठी माजी उपसभापती सुनील मोरजकर हेही इच्छुक होते. पंचायत समितीवर २५ वे सभापती होण्याचा मान परब यांना मिळणार आहे.

पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे ५, काँग्रेसचे ४ तर भाजपचा एक सदस्य आहे. शिवसेनेने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या एकमेव सदस्या सौ. स्मिता दामले यांना सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवसेना-भाजपचा गट स्थापन केला आहे. पाच वर्षांसाठी सौ. दामले यांना उपसभापतिपद दिले जाणार आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी सभापतिपदासाठी सर्वसाधारण आरक्षण असल्याने खुल्या प्रवर्गातील शिवसेनेचे सदस्य यशवंत परब यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार आहे. शिवसेनेतर्फे सुनील मोरजकर, यशवंत परब, श्‍यामसुंदर पेडणेकर, प्रणाली बंगे व अनुश्री कांबळी या निवडून आल्या याहेत.

शिवसेनेला एकमेव सदस्य असलेल्या भाजपची साथ आहे. वेंगुर्ले पंचायत समितीच्या स्थापनेपासून गेल्या ५५ वर्षांत पंचायत समितीवर काँग्रेस, जनता दल, प्रशासकीय राजवट, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता लाभली आहे. या वेळी शिवसेना भाजपची सत्ता या पंचायत समितीवर आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता होती. या निवडणुकीत त्यांचा एकही सदस्य निवडून आला नाही. निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त झाली. 
 

भाजपचा केवळ एकमेव सदस्य निवडून आला.
१ मे १९६० ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यातूनच रत्नीागिरी व सिंधुदुर्गची मिळून रत्नागिरी जिल्हा परिषद अस्तित्वात आली. रत्नागिरी जिल्हा परिषद असतांना वेंगुर्ले पंचायत समितीवर पहिले सभापतिपद पु. शी. देसाई यांनी भूषविले. १९६२ ते ६७ अशी ५ वर्षे ते सभापती होते. त्यानंतर ४ महिन्यासाठी दत्तात्रय निळकंठ नाईक सभापती होते. १९६७ मध्ये पुन्हा पु. शि. देसाई सभापती झाले. १९७१ मध्ये देवराव हिरे परब सभापती व राजाराम बागायतकर उपसभापती झाले. १९७९ ते १९८१ पर्यंत शिरोडा येथील समाजवादी जनता पक्षाचे ज. ल. गावडे सभापती झाले. त्यावेळी सुधीर सबनीस व जयप्रकाश चमणकर एक-एक वर्षासाठी उपसभापती झाले. १९६२ ते १९७९ अशी सात वर्षे या पंचायत समितीवर काँग्रेसची सत्ता होती. पुढील काळात मात्र समाजवादी जनता पक्षाची सत्ता राहिली.

त्यानंतर ११ वर्षांच्या प्रशासकीय कारभारानंतर १९९२ ते २००२ अशी १० वर्षे या पंचायत समितीवर जनता दलाची सत्ता राहिली. या कालावधीत जनता दलाचा वेंगुर्ले तालुका बालेकिल्ला होता. १९९२ ते १९९७ या पाच वर्षांच्या कालावधीत जयप्रकाश चमणकर सभापती तर दीपक नाईक उपसभापती होते. १९९७ मध्ये दीपक नाईक सभापती तर अश्‍विनी सातोसकर उपसभापती झाल्या. त्यानंतर अश्‍विनी सातोसकर सभापती तर सुनील म्हापणकर उपसभापती झाले. १९९९ ते २००२ या कालावधीत आरवलीच्या सुखदा पालयेकर सभापती तर दशरथ नार्वेकर उपसभापती झाले. २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत पंचायत समितीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला. नीलेश सामंत सभापती तर साधना डोंगरे उपसभापती बनल्या. त्यानंतर नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आल्यावर पंचायत समितीवर नीलेश सामंत पुन्हा एकदा काँग्रेसचे म्हणून सभापती तर काँग्रेसचे प्रफुल्ल ऊर्फ बाळू परब उपसभापती झाले. २००२ ते २०१२ अशी दहा वर्षे पुन्हा काँग्रेसची सत्ता राहिली. या कालावधीत साधना डोंगरे, अजित सावंत, बाळकृष्ण ऊर्फ आबा कोंडसकर, नीलेश सामंत, वंदना किनळेकर, सारिका काळसेकर हे सभापती झाले.

२०१२ च्या निवडणुकीत दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना येथील पंचायत समितीवर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. राष्ट्रवादीचे पहिले सभापती होण्याचा मान अभिषेक चमणकर यांना तर सुनील मोरजकर यांना उपसभापती होण्याचा मान मिळाला होता. त्यानंतर केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पंचायत समितीतील राष्ट्रवादीच्या सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यानंतर सुचिता वजराठकर शिवसेनेच्या सभापती झाल्या. काँग्रेस पुरस्कृत अपक्ष सदस्य स्वप्नील चमणकर उपसभापती बनले होते.

या वेळी झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपची सत्ता आल्याने शिवसेनेचे यशवंत परब सभापती तर भाजपच्या स्मिता दामले उपसभापती म्हणून १४ मार्चला विराजमान होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com