पाणी घटतेय फुटाफुटाने; उपाययोजना मात्र कासवगतीने

नंदकुमार आयरे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

सिंधुदुर्गनगरी -जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विहिरींची पाणीपातळी प्रतिदिन अर्धा ते एक फुटाने खाली जात आहे. तरीही टंचाई उपाययोजनांच्या कामात अद्यापही गती आलेली नसल्याने नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. आतापर्यंत उपाययोजनेच्या १४१ कामांना मंजुरी मिळाली आहे.

सिंधुदुर्गनगरी -जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विहिरींची पाणीपातळी प्रतिदिन अर्धा ते एक फुटाने खाली जात आहे. तरीही टंचाई उपाययोजनांच्या कामात अद्यापही गती आलेली नसल्याने नागरिकांची चिंता वाढत चालली आहे. आतापर्यंत उपाययोजनेच्या १४१ कामांना मंजुरी मिळाली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असूनही दरवर्षी टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. जिल्हा प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत असल्या तरी त्यामध्ये गांभीर्य नसल्याने करण्यात येणाऱ्या योजना केवळ सोपस्कार ठरत आहेत. जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्टही पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे यावर्षीची पाणीटंचाई अधिक तीव्र जाणवू लागली आहे.

जिल्ह्याचा यावर्षीचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तब्बल ५ कोटींचा आहे. त्यामध्ये पाच गावे व २९२ वाड्यांचा समावेश आहे. कोट्यवधींचे आराखडे मंजूर असले तरी प्रत्यक्षात आराखड्यातील ५० टक्केही कामे पूर्ण होताना दिसत नाहीत. त्यामध्ये आवश्‍यक असलेली जमिनीची बक्षीसपत्रे व अन्य अडचणींमुळे कोट्यवधींच्या आराखड्याला मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात कामे पूर्ण होत नाहीत. सद्यस्थितीत जिल्ह्यातील अनेक वाडी-वस्तीवर पाणीटंचाई जाणवत आहे. मात्र, उपाययोजनेची कामे करण्यासाठी आवश्‍यक तो शासकीय सोपस्कार पार पडून प्रत्यक्ष काम पूर्ण होईपर्यंत पावसाळा येतो आणि नंतर ती कामे होत नाहीत. अशाप्रकारे दरवर्षी प्रशासनाचे ‘कार्यचक्र’ सुरूच आहे. जनतेला आवश्‍यक पाण्याची मात्र वानवा कायम आहे. ज्या गावात, वाडीवस्तीवर दरवर्षी पाणीटंचाई भासते अशा ठिकाणी सुरवातीच्या टप्प्यातच पाणीटंचाई निवारणाची कामे घेण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, जोपर्यंत तेथे प्रत्यक्ष पाणीटंचाई दिसून येत नाही तोपर्यंतच प्रशासनाकडून हालचाली सुरू होत नाहीत व त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता, मंजुरी आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात यासाठी पावसाळा सुरू होतो. अशा रीतीने प्रशासनाकडून उपाययोजनांची कामे केली जात असल्याने दरवर्षी लाखो रुपये खर्चूनही जिल्ह्यातील पाणीटंचाई ‘जैसे थे’ अशीच आहे. सिंधुदुर्गातील ५ गावे २९२ वाड्यांच्या आराखड्यातील २७४ वाड्यांचे प्रपत्र ‘अ’ प्राप्त झाले आहे. त्यापैकी २०४ कामांचे सर्वेक्षण होऊन प्रत्यक्षात ९४ कामांचे प्रपत्र ‘ब’ प्राप्त झाले आहे. यापैकी विविध १९० कामे प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली. त्यापैकी १४१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामध्ये विंधन विहिरीच्या ५२ प्रस्तावांपैकी ४६ कामांना मंजुरी, विंधन विहिरीच्या दुरुस्ती ३० प्रस्तावांपैकी ३० प्रस्तावांना मंजुरी, गाळ काढणे ४९ पैकी ४९ कामांना मंजुरी, नळपाणी पुरवठा दुरुस्ती ५२ कामांपैकी १३ कामांना मंजुरी, तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजनेच्या ७ प्रस्तावांपैकी ३ कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये दोडामार्ग ५, सावंतवाडी १०, वेंगुर्ले ३०, कुडाळ १४, कणकवली १८, वैभववाडी २८, देवगड २२ तर मालवण तालुक्‍यातील १४ कामांचा समावेश आहे.

मंजूर कामांना सुरवात केव्हा?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पाणीटंचाईच्या विविध १४१ कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. मात्र, या कामांना प्रत्यक्ष सुरवात केव्हा होणार? टंचाईग्रस्तांना पाणी केव्हा मिळणार, याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे मंजूर कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी टंचाई निवारणाच्या कामात गती देण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक जनतेचे सहकार्यही मोलाचे आहे.

उष्म्याचा तडाखा
जिल्ह्यात गेल्यावर्षीइतकीच टंचाईची तीव्रता राहण्याची शक्‍यता आहे. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाई जाणवली होती. यंदा पुरेशा पावसामुळे भूजल साठा चांगला होता. मात्र, उष्मा प्रचंड वाढल्याने बाष्पीभवनामुळे टंचाईची तीव्रता वाढली.

Web Title: Water level of wells is going down