७९ वाड्यांना केवळ ११ टॅंकर्सचा आधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

रत्नागिरी - वाढत्या उष्म्यामुळे जिल्ह्यातील ४ तालुक्‍यांना टंचाईची झळ मोठ्या प्रमाणात पोचली आहे. ४३ गावांतील ७९ वाड्यांमध्ये टॅंकरची मागणी झाली होती. त्यानुसार ११ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षीपेक्षा टॅंकरग्रस्त गावांची संख्या अधिक आहे. गतवर्षी ३७ गावांतील ६२ वाड्यांमध्ये टॅंकर सुरू होता. उष्म्याचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात टॅंकरग्रस्त गावांमध्ये अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या घटेल असा अंदाज होता; परंतु खेड तालुक्‍यात पहिला टॅंकर धावला. त्यानंतर चिपळूण, दापोली, संगमेश्‍वर, गुहागरमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरवात झाली. सर्वात जास्त टंचाईग्रस्त वाड्या खेड तालुक्‍यात आहेत. वाढत्या उष्म्यामुळे नदी, नाले, छोटी धरणे कोरडी पडू लागली आहेत. सध्या पारा ३६ अंश सेल्सिअसवर स्थिरावला आहे. त्यामुळे हवेत गर्मीही तेवढीच जाणवत आहे. त्याचा परिणाम भूगर्भातील पाणी पातळीवर झाला आहे. कातळावरील धनगरवाड्यांना तर पाण्यासाठी दोन किमी पायपीट करावी लागत आहे. एकूण १६ धनगरवाड्या टंचाईग्रस्त आहेत.

पाच तालुक्‍यातील ७९ वाड्यांना ११ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. खेडमध्ये ३३ वाड्यांसाठी २ खासगी आणि २ शासकीय टॅंकरचा उपयोग केला जातो. ही गावे तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यात डोंगरावर वसलेली असल्याने त्यांना नियमित पाणी पुरविणे शक्‍य नाही. दोन दिवसाआड पाणी पुरविण्याशिवाय पर्याय नाही. पाण्याची मागणी वाढत असली तरीही टॅंकरची संख्या कमी आहे. खासगी टॅंकर अधिग्रहीत करावे लागत आहेत. गतवर्षीप्रमाणेच टॅंकर चालकांची मनधरणी करून पाणी वापरावे लागत आहे. रत्नागिरी तालुक्‍यात सहा वाड्यांमधून टॅंकरची मागणी आली आहे. त्यावर उपाययोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

एप्रिल महिना संपण्यासाठी अजून सहा दिवस शिल्लक आहे. कडाक्‍याचा उन्हाळा मे महिन्यात सर्वाधिक जाणवतो. कालावधीत पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस लवकर पडेल असा अंदाज आहे. हा दिलासा असला तरीही पावसाळा सुरू होईपर्यंत आराखड्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढीव राहणार हे निश्‍चित आहे.