विकास आम्हीच करू; इतरांच्या वल्गनाच

विकास आम्हीच करू; इतरांच्या वल्गनाच

कणकवली : आजवर कोकण विकासाच्या फक्त वल्गनाच झाल्या. प्रत्यक्ष विकासाचे काम काही उभे राहिले नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री विकासाला पैसाच नाही असे सांगत होते; पण नितीन गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गासाठी 20 हजार कोटींची तरतूद केली. याखेरीज कोकण विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हाताला आम्ही काम मिळवून देणार आहोत, अशी ग्वाही राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिली.

येथील भगवती मंगल कार्यालयात भाजप जिल्हा संघटनेचा अटलबंधन मेळाव्याचा कार्यक्रम झाला. यात राज्यमंत्री श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी म्हाडाचे माजी अध्यक्ष प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, महिला जिल्हाध्यक्षा स्नेहा कुबल यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, अजित गोगटे, संजय यादव आदींनी भाषणे केली. यावेळी प्रमोद रावराणे, जयदेव कदम, सतीश धोंड, राजश्री धुमाळे, हनुमंत सावंत, राजन म्हापसेकर, रवींद्र शेट्ये आदी उपस्थित होते.
 

श्री. चव्हाण म्हणाले, ""भाजप सरकारमुळे विकासाची गंगा घराघरांत पोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महामार्ग चौपदरीकरण बाधितांना आम्ही पाच पट मोबदला देणार आहोत. कोकणासाठी विकासाचे वेगळे धोरण आखले जातेय. पुढील विधानसभा निवडणुकीत कोकणातील प्रत्येक मतदारसंघातून भाजपचाच उमेदवार विजयी होईल, यादृष्टीने आम्ही काम सुरू केलेय. त्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारने अनेकविध योजना आखल्या आहेत. त्या पोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने चोख पार पाडली तर शत प्रतिशत भाजप हे स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.‘‘
 

भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावाचे माती परीक्षण करून त्याबाबतची माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवावी. इथल्या प्रत्येक जनतेच्या अडीअडचणीला धावून जायला हवे. समाजात वावरताना डोक्‍यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून काम करावे, असेही आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
 

प्रमोद जठार म्हणाले, ""कुणाला उत्तर देण्यासाठी आमचे अटलबंधन नाही. सत्तेची ताकद तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोचविण्यासाठी हा कार्यक्रम आहे. कार्यकर्त्यांनी पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत आपली ऊर्जा शाबूत ठेवावी. तोपर्यंत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषदा आपल्याच ताब्यात असणार आहेत.‘‘
 

स्नेहा कुबल म्हणाल्या, ""पूर्वी मुंबईत कार्यक्रमांचा प्रारंभ व्हायचा आणि नंतर कोकणासह राज्यात अंमलबजावणी व्हायची. अटलबंधन हा असा कार्यक्रम आहे, ज्याची सुरवात सिंधुदुर्गातून होत आहे. अटलबंधनात 34 धागे आहेत. तेवढ्या माणसांपर्यंत प्रत्येक कार्यकर्ता पोचला तरी शत प्रतिशत भाजप हे स्वप्न प्रत्यक्षात येईल.‘‘
 

कार्यक्रमात अजित गोगटे, संजय यादव, प्रसाद लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. सुरवातीला राज्यमंत्री श्री. चव्हाण यांनी प्रमोद जठार यांना अटलबंधन बांधले. त्यानंतर इतर तालुकाध्यक्षांना अटलबंधन बांधण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात शहीद जवानांच्या पत्नी तिलोत्तमा सावंत आणि स्वातंत्र्यसेनानी सूर्यकांत परमेकर यांचा सत्कार झाला. त्यानंतर जिल्हाभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश देण्यात आला.
 

हिंदुत्वाप्रमाणे भाजप घराघरांत पोचवा
बजरंग दलाने जसे हिंदुत्व घराघरांत पोचवले, त्याच धर्तीवर अटलबंधनच्या माध्यमातून भाजप संघटना प्रत्येक घरात, व्यक्तींपर्यंत पोचवा, असे आवाहन राज्यमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.
 

त्यावेळी गप्प का होता?
महामार्ग चौपदरीकरण बाधितांना आम्ही पाच पट मोबदला देणार आहोत; पण काही आमदार मंडळी 20 पट मोबदला द्या, असे सांगून विकासकामांत गैरसमज पसरवीत आहेत. यापूर्वी पंधरा वर्षे तुम्ही सत्तेत होता. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना वीस पट मोबदला द्यायला कुणी अडवलं होतं, असाही प्रश्‍न श्री. चव्हाण यांनी उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com