ब्रिटिशकालीन पुलावरून वाहतूक सुरु का?: सेना

पीटीआय
गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

मुंबई - "सावित्री नदीवरील दुर्घटनाग्रस्त पुलाच्या बाजूलाच नवीन पूल बांधला आहे. त्यावरूनही वाहतूक सुरू असते. हा पूल देशातील अभियांत्रिकी कौशल्याचा एक नमुना मानला जातो. पण तरीही ब्रिटिशकालीन पुलावरून वाहतूक का सुरू ठेवण्यात आली होती?‘, असा प्रश्‍न शिवसेनेने "सामना‘च्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळील राजेवाडी येथे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून एसटीच्या दोन बससह चार-पाच वाहने बुडाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातावर शिवसेनेने "सामना‘च्या अग्रलेखातून भाष्य केले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, "ब्रिटिशकालीन पूल म्हणजे जणू "मृत्यूचे पूल‘ ठरू लागले आहेत. त्या सर्व ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद सरकारला करावी लागेल हे खरे असले तरी, निदान आता तरी ब्रिटिशकालीन पुलांना पर्यायी नवे पूल बांधण्याचा श्रीगणेशा केला तरी सावित्री नदीवरील दुर्घटनेपासून धडा घेतला असे म्हणता येईल. किमान सध्याच्या धुवाधार पावसाच्या, सावित्रीला आलेल्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर जरी हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला असता तर मंगळवारची भीषण दुर्घटना टळू शकली असती. अर्थात, आपल्या प्रशासकीय यंत्रणांना योग्य वेळी योग्य शहाणपण सुचेल का, या प्रश्‍नाचे उत्तर अजून तरी सापडू शकले नाही.‘