भारताच्या लढती मुंबईऐवजी दिल्लीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नवी दिल्ली - विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील भारताच्या लढती मुंबईऐवजी दिल्लीत खेळवण्याचा निर्णय घेणे जागतिक फुटबॉल महासंघास भाग पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारची या संदर्भातील विनंती आम्ही खूपच गांभीर्याने घेत आहोत, असे ‘फिफा’ने सांगितले.

केंद्र सरकारच्या आग्रहामुळे जागतिक फुटबॉल महासंघाचा निर्णय
नवी दिल्ली - विश्‍वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील भारताच्या लढती मुंबईऐवजी दिल्लीत खेळवण्याचा निर्णय घेणे जागतिक फुटबॉल महासंघास भाग पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारची या संदर्भातील विनंती आम्ही खूपच गांभीर्याने घेत आहोत, असे ‘फिफा’ने सांगितले.

विश्‍वकरंडक स्पर्धेचा कार्यक्रम गटवारीनुसार जाहीर करताना ‘अ’ गटातील लढती मुंबईत होतील, असे ठरले होते. विश्‍वकरंडक स्पर्धेत यजमानांचा समावेश ‘अ’ गटात असतो आणि त्यांना ‘अ-१’ असे संबोधले जाते. त्यानुसार भारताच्या सर्व लढती नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार होत्या. 

आम्ही स्पर्धेतील सर्वांत महत्त्वाच्या निर्णयावर काम करीत आहोत. आम्ही भारत सरकारची विनंती खूपच गांभीर्याने घेत आहोत. ते स्पर्धा संयोजनातील आमचे मुख्य सहकारी आहेत, असे जागतिक फुटबॉल महासंघाच्या स्पर्धा कार्यक्रम समितीचे प्रमुख जैमी यार्झा यांनी सांगितले. आम्ही भारतीय फुटबॉल महासंघ, तसेच सरकारच्या साथीत भारतीय फुटबॉलच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील आहोत. सर्वांना समाधान देईल, असा निर्णय घेण्याचे आम्ही ठरवले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

दिग्गज फुटबॉलपटू येणार
भारतातील पहिली विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा ६ ते २८ ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम कार्यक्रम ७ जुलैला मुंबईत जाहीर होणार आहे. त्यांनी या कार्यक्रमास जगातील दोन दिग्गज फुटबॉलपटू उपस्थित राहतील, असे सांगितले. दिग्गज फुटबॉलपटू खूपच व्यग्र असतात. भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या फुटबॉलपटूंनाच आम्ही निमंत्रित केले आहे. त्यांची नावे आताच जाहीर करणे अयोग्य होईल. फुटबॉल चाहत्यांची नक्कीच निराशा होणार नाही, याची खात्री बाळगा, असेही यार्झा यांनी सांगितले. 

तिकीट विक्रीस वेग येईल
गोवा, तसेच दिल्लीतील तिकीट विक्रीस अल्प प्रतिसाद असला तरी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर त्यास वेग येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय भविष्यातील फुटबॉलचा स्टार खेळ पाहण्याची संधी नक्कीच सोडणार नाहीत. तिकीट विक्री वाढीसाठी आम्हाला नवी मुंबई, दिल्ली, गोव्यात प्रयत्न करावे लागतील. मात्र, अनेक देशांत स्पर्धा कार्यक्रम अंतिम जाहीर झाल्यावरच तिकीट विक्रीस वेग येतो. आतापर्यंत आम्ही एकंदरीत तिकीट विक्रीवर समाधानी आहोत, असे यार्झा यांनी सांगितले.