आम्हीही इतके चांगले खेळलो नव्हतो! :धनराज

वृत्तसंस्था
बुधवार, 22 जून 2016

मुंबई :  चॅंपियन्स हॉकी स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी नक्कीच विलक्षण होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी जगज्जेत्यांना दिलेली झुंज विसरता येणार नाही. आमच्याकडूनही कधी इतका चांगला खेळ झाला नव्हता, अशा शब्दात माजी ऑलिंपियन धनराज पिल्ले याने भारतीय हॉकी संघाची पाठ थोपटली.

एका खासगी कामासाठी धनराज मुंबईत आला होता. तेव्हा त्याने स्वाभाविकपणे भारतीय हॉकीविषयी मनसोक्त भाष्य केले. तो म्हणाला, ""अंतिम सामन्यात 60 मिनिटे सातत्य आम्हाला देखील राखता आले नव्हते. या संघातील नवोदित खेळाडूंनी अपेक्षा निश्‍चित उंचावल्या आहेत. हार आणि जीत हा खेळाचा भाग असतो. पण, अंतिम सामन्यात भारतीय संघाने केलेला खेळ सर्वोत्तमच होता.‘‘
 
या स्पर्धेतील कामगिरी निश्‍चितच प्रेरक आहे. ऑलिंपिकसाठी वरिष्ठ खेळाडू जेव्हा संघात येतील तेव्हा तो भारतीय संघ धक्कादायक निकाल नोंदवू शकतो, असा विश्‍वास व्यक्त करून धनराज म्हणाला, ""चॅंपियन्ससाठी वरिष्ठ खेळाडूंचा समावेश नव्हता. पण, प्रशिक्षकाने योग्य वेळी संघ बदलाचा प्रयोग केला. या संघात जेव्हा सरदारचा समावेश होईल, तेव्हा संघाची ताकद आणखीन वाढेल. सरदारला सर्वांना बरोबर घेऊन जाणे चांगले जमते.‘‘
 
खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करतानाच धनराजने तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्याचा, दुखापतीपासून दूर राहण्याचा आणि योग्य औषधं घेण्याचा सल्लाही खेळाडूंना दिला.

ऑलिंपिकला हा संघ काहीही करू शकतो. अर्थात, तुम्ही अंतिम फेरी गाठालच असे नाही. एका वेळेस एका सामन्याचा विचार करा. तुम्ही उद्दिष्टापर्यंत निश्‍चित पोचाल.

- धनराज पिल्ले