हॉकी : ब्रिटनने भारताला 2-2 बरोबरीमध्ये रोखले

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

सुलतान अझलन शाह स्पर्धेतील भारताचे आगामी सामने : 

  • 30 एप्रिल : भारत विरुद्ध न्यूझीलंड 
  • 2 मे : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
  • 3 मे : भारत विरुद्ध जपान 
  • 5 मे : भारत विरुद्ध मलेशिया 

इपोह (मलेशिया) : येथे आजपासून (शनिवार) सुरू झालेल्या सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या सलामीच्या ब्रिटनविरुद्धच्या सामन्यात भारताला 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. खराब वातावरणामुळे नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीरा हा सामना सुरू झाला. 

भारताकडून या सामन्यात चांगली सुरवात झाली. आकाशदीपने 19 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. मात्र, पूर्वार्ध संपण्यासाठी काही क्षण राहिले असतानाच ब्रिटनकडून टॉम कार्सनने गोल करत बरोबरी साधली. यानंतर उत्तरार्धामध्ये 46 व्या मिनिटाला मनदीपसिंगने दुसरा गोल करत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 53 व्या मिनिटाला ऍलन फॉरसिथने गोल केल्याने ब्रिटनने पुन्हा बरोबरी साधली. 

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेचे यंदाचे 26 वे वर्ष आहे. या स्पर्धेत भारताला पाच वेळा विजतेपद मिळाले आहे. सध्या हॉकीच्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. यंदाच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या सहा संघांमध्ये भारताला दुसरे मानांकन आहे. गेल्या वर्षीही या स्पर्धेत भारत उपविजेता होता. गेल्या वर्षी अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.