भारताला अखेर ब्राँझ; न्यूझीलंडवर दणदणीत विजय

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

ब्रिटन विजेता 
ब्रिटनने जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला 4-3 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद मिळविले. ब्रिटनने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. डेव्हिड गुडफिल्डने दोन गोल केले.

इपोह (मलेशिया) : सुलतान अझलन शाह करंडक हॉकी स्पर्धेत भारताने अखेर ब्राँझपदक जिंकण्याची कामगिरी नोंदविली. मलेशियाविरुद्ध शुक्रवारी हरल्यामुळे भारताची अंतिम फेरीची संधी हुकली. त्यानंतर भारताने खेळ उंचावत तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत न्यूझीलंडवर मोठा विजय नोंदविला. रुपिंदरपाल सिंग याने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविलेले दोन गोल महत्त्वपूर्ण ठरले. 

'बर्थडे बॉय' एस. व्ही. सुनील आणि तलविंदर यांनी प्रत्येकी एका गोलाचे योगदान दिले. पहिल्या सत्रात एकही गोल झाला नाही. त्यानंतर भारताने न्यूझीलंडच्या क्षेत्रात वारंवार चढाया करीत दडपण आणले. या सत्राच्या दुसऱ्या मिनिटास रुपिंदरने पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावला. दहा मिनिटांनी त्यानेच दुसरा गोल केला. दुसऱ्या सत्रातील दोन गोलांमुळे भारताकडे भक्कम आघाडी जमली. तिसऱ्या सत्रात भारताने पकड कायम राखली. चौथ्या सत्रात सुनीलने मैदानी गोल केला. त्यामुळे न्यूझीलंडच्या प्रतिआक्रमणाच्या आशांना धक्का बसला. तलविंदरने अखेरच्या क्षणी किवींना आणखी एका गोलचा धक्का दिला. मागील स्पर्धेत भारताला उपविजेतेपद मिळाले होते. 

मलेशिया पाचवा 
यजमान मलेशियाने जपानला 3-1 असे हरवून पाचवा क्रमांक मिळविला. स्पर्धेत सलामीला उभय संघांमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली होती. आधीच्या सामन्यात जपानने इतिहासात प्रथमच ऑस्ट्रेलियाला हरविले होते, तर मलेशियाने आशियाई सुवर्णपदक विजेत्यांना धक्का दिला होता. त्यामुळे ही लढत अटीतटीची होण्याची अपेक्षा होती, प्रत्यक्षात मलेशियाने सहज विजय मिळविला. जपानला या स्पर्धेत अद्याप एकदाही पदक जिंकता आलेले नाही. 

निकाल 
भारत 4
(रुपिंदरपाल सिंग 17, 27, एस व्ही. सुनील 48, तलविंदर सिंग 60) विवि न्यूझीलंड 0.