भारतीय खेळाडूंसमोर क्षमता दाखवून देण्याची वेळ - ऑल्टमन्स

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

बंगळूर - गेल्या काही वर्षांत भारतीय हॉकी संघाने आपल्या कामगिरीने हॉकी विश्‍वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आता ही कामगिरी भूतकाळ समजून भारतीय खेळाडूंसमोर हॉकी विश्‍वाला आपली क्षमता दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी येथे व्यक्त केले.

बंगळूर - गेल्या काही वर्षांत भारतीय हॉकी संघाने आपल्या कामगिरीने हॉकी विश्‍वाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. आता ही कामगिरी भूतकाळ समजून भारतीय खेळाडूंसमोर हॉकी विश्‍वाला आपली क्षमता दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रोएलॅंट ऑल्टमन्स यांनी येथे व्यक्त केले.

हॉकी इंडिया लीगच्या दरम्यान जर्मनीचा आंतरराष्ट्रीय खेळाडू मॉर्टिझ फ्युएर्स्टे याने भारतीय संघ लवकरच पहिल्या तीनमध्ये येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्याला अनुसरूनच ऑल्टमन्स यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ""एका अव्वल खेळाडूकडून भारतीय खेळाडूंना मिळालेली ही शाबासकी होती. तीन-चार वर्षांपूर्वी अशी वेळ होती की भारतीय हॉकी संघाकडे कुणी गांभीर्याने बघतही नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. भारतीय संघ अव्वल खेळाडूंच्या बरोबरीने कामगिरी करू लागला आहे. भविष्यात नुसते बरोबर नाही, तर आम्ही कुठल्याही संघावर मात करू शकतो हे दाखवून द्यायची वेळ आली आहे.''

आशियाई चॅंपियन्स, कुमार विश्‍वकरंडक स्पर्धेतील विजेतेपद अशी कामगिरी बघितल्यावर भारतीय संघ पुन्हा एकदा गतवैभवाच्या जवळ येऊ लागला आहे याची साक्ष पटते. भारतीय संघ आता एप्रिलमध्ये अझलन शाह करंडक, जूनमध्ये वर्ल्ड लीग उपांत्य फेरी, सप्टेंबरमध्ये पुरुष आशियाई करंडक आणि डिसेंबरमध्ये वर्ल्ड लीग फायनल अशा प्रमुख स्पर्धेत खेळणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑल्टमन्स म्हणाले, 'सध्या पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी भक्कम भारतीय संघ उभारण्याकडे आम्ही सर्व लक्ष केंद्रित केले आहे. पण, त्यापूर्वी होणाऱ्या सर्व स्पर्धांमधील सातत्यपूर्म कामगिरी आमच्यासाठी आत्मविश्‍वास उंचावणारी ठरणार आहे.''

ऑल्टमन्स म्हणाले
- चांगल्या निकालासाठी खेळाडूंनी जबाबदारी वाटून घ्यायला हवी
- सर्वोत्तम कामगिरी दाखवताना वैयक्तिक विकास नव्हे, तर सांघिक योगदान द्यायला हवे
- तंत्र आणि कौशल्य विकसित करताना त्याला शास्त्रीय दृष्टिकोनाची जोड द्यायला हवी
- शास्त्रीय दृष्टिकोन ही सध्या आंतरराष्ट्रीय हॉकीची गरज आहे
- दडपणाचा ते कसा सामना करू शकतात हे पाहूनच सराव आणि त्यांच्या चाचणीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे

मैदानावर खेळताना स्वतःसाठी नव्हे, तर संघासाठी खेळायचे हे आता खेळाडूंच्या मनात पक्के बसले आहे. हा बदल भारतीय संघाला एक दिवस नक्कीच बहुमोल यश मिळवून देईल.
- रोएलॅंट ऑल्टमन्स