हॉकी प्रो-लीगमधून भारताची माघार

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

मुंबई/नवी दिल्ली - अतिशय गाजावाजा करून घोषित करण्यात आलेल्या हॉकी प्रो-लीगचा आर्थिक आधार असलेल्या भारताने माघार घेतली आहे. २०१९ च्या जानेवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा ऑलिंपिक पात्रतेपैकी एक असली तरी या स्पर्धेतून महिला संघाला जास्त संधी नसल्यामुळे भारताने माघार घेण्याचे ठरविले आहे.

मुंबई/नवी दिल्ली - अतिशय गाजावाजा करून घोषित करण्यात आलेल्या हॉकी प्रो-लीगचा आर्थिक आधार असलेल्या भारताने माघार घेतली आहे. २०१९ च्या जानेवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा ऑलिंपिक पात्रतेपैकी एक असली तरी या स्पर्धेतून महिला संघाला जास्त संधी नसल्यामुळे भारताने माघार घेण्याचे ठरविले आहे.

हॉकी प्रीमियर लढतीतून मिळणारे गुण, तसेच ऑलिंपिक पात्रतेत किती कोटा हे जाहीर केलेले नाही. हॉकी इंडियाने त्यामुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने हा निर्णय स्वीकारला आहे. हॉकी प्रो-लीग ही युरोपीय संघांसाठी झुकते माप देणारी असल्यामुळे माघारीचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. 

सध्याच्या परिस्थितीत पाच खंडांचे विजेते, तसेच यजमानांना थेट प्रवेश असतो. हॉकी प्रीमियर लीगमधील चार, तसेच हॉकी वर्ल्ड लीगच्या दुसऱ्या फेरीतील अव्वल सहा संघ, तसेच दोन अव्वल मानांकित संघांना प्रवेश असतो. हॉकी प्रो-लीगमधून माघारीसाठी १७ जुलै ही अखेरची तारीख होती. त्यानंतर माघार घेतल्यास जबरदस्त आर्थिक दंड होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय हॉकीतून दोन वर्षे बडतर्फ केले जाण्याची टांगती तलवारही होती. आम्ही ऑलिंपिकमध्ये फुकट प्रवेश मागत नाही; पण त्याबाबतच्या प्रक्रियेत तरी स्पष्टता असावी, असे हॉकी इंडियाचे पदाधिकारी सांगत आहेत. हॉकी वर्ल्ड लीगमध्ये तुलनेत कमकुवत संघ आहेत. त्याद्वारे पात्रतेची जास्त संधी असेल, असा विचार करण्यात आला आहे.

भारताच्या अनुपस्थितीचा फटका
हॉकी प्रो-लीगद्वारे उत्पन्नाचे गणित आखताना त्यात भारतातील सहभाग महत्त्वाचा होता. त्यामुळे भारताच्या महिला संघास प्रवेश होता, तसेच पाकच्या पुरुष संघासही. ही लीग सहा महिने वीकेंडला होणार आहे. आता भारताचा सहभाग नसेल, तर पुरस्कर्ते गवसणार नाहीत, असाही विचार होत आहे. 

अन्‌ पुरुष संघाला फटका
महिला संघाचा ऑलिंपिक प्रवेश सुकर होण्यासाठी पुरुष संघावर अन्याय झाला आहे. भारताचे दोन संघ असल्यामुळे या लीगसाठीच्या सहभागाचा अर्ज एकच होता आणि त्याचा फटका पुरुष संघाला बसला आहे. हा संघ प्रो-हॉकी लीगद्वारे ऑलिंपिकला सहज पात्र ठरला असता, याबाबत हॉकी इंडिया पदाधिकाऱ्यांत एकमत आहे. आम्ही महिला संघाला वाऱ्यावर सोडू शकत नाही, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या माघारीमुळे पुरुष संघास अव्वल संघाविरुद्ध खेळण्याची संधी कमी मिळेल.

टॅग्स